Zeenat Aman : सत्तरच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. झीनत यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडला वेड लावलं होतं. तसेच झीनत यांनी 'फेमिना मिस इंडिया' आणि 'मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल' हे किताब जिंकले आहेत.
झीनत यांचे गाजलेले सिनेमे -
'हलचल' या सिनेमाच्या माध्यमातून झीनत यांनी बॉलिवूडमध्ये पदर्पण केलं. त्यानंतर झीनत यांची सिनेसृष्टीतली गाडी सुसाट सुटली. त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. झीनत यांनी 'हरे रामा हरे कृष्णा', 'यादों की बारात', 'रोटी कपडा और मकान', 'अजनबी', 'डॉन', 'धरमवीर', 'धुंध', 'कुर्बानी', 'इंसाफ का तराजू', 'वॉरंट','पुकार', 'दोस्ताना', 'डार्लिंग डार्लिंग', 'सत्यम शिवम सुंदरम', 'छैला बाबू','हम किसी से कम नहीं', 'लावारिस' आणि 'चोरी मेरा काम' अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे.
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी झीनत अमान!
सत्तरच्या दशकात झीनत यांनी महिलांसाठी असलेल्या सर्व स्टिरियोटाइप्स मोडून काढल्या आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सत्तरच्या दशकातील महिला कलाकारांची इमेज बदलण्यात झीनत यांचा मोलाचा वाटा आहे. त्यावेळी त्यांनी त्यांच्या फॅशन आणि स्टाइलने चाहत्यांना घायाळ केलं.
झीनत सिनेमांसह कायम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. झीनत आणि संजय खानच्या अफेअरची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. दोघांनी गुपचूप लग्न करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. लग्नानंतर दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन सतत खटके उडत असे. तसेच संजय झीनत यांना मारहाणदेखील करत असे.
झीनत यांनी संजय खान यांच्यासोबत घटस्फोट घेतला. विभक्त झाल्यानंतर त्यांनी सिने-निर्माता मजहर खानसोबत लग्न केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि झीनत आणि मजहर विभक्त झाले. त्यामुळे दोन लग्न होऊनही झीनत या एकट्या राहतात. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या,"लग्न हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात चुकीचा निर्णय आहे".
झीनत अमानचं कमबॅक!
झीनत अमान हिंदी सिनेसृष्टीतील एकेकाळची आघाडीची नायिका आहे. आजवर त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. पण सिनेसृष्टीतील प्रवासाच्या सुरुवातील सतत सिनेमे फ्लॉप होत असल्याने त्यांनी काही काळ काम न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान त्यांना 'हरे रामा हरे कृष्णा' या सिनेमासाठी विचारणा झाली. या सिनेमात त्यांच्यासोबत देव आनंददेखील मुख्य भूमिकेत होता. या सिनेमामुळे झीनत अमान यांना विशेष लोकप्रियता मिळाली.
संबंधित बातम्या