Zarina Wahab Birthday : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री जरीना वहाब (Zarina Wahab) आज (17 जुलै) आपला 63वा वाढदिवस साजरा करत आहे. जरीना वहाब बॉलिवूडच्या अशा सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी मोठ्या पडद्यावर तसेच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली. 17 जुलै 1959 रोजी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे जरीना वहाब यांचा जन्म झाला. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेल्या जरीना यांची हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त उर्दू आणि तेलगू भाषांवर चांगली पकड आहे.
जरीना वहाब यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे शिक्षण घेतले आणि अभिनेत्री बनण्यासाठी त्या स्वप्नांची नगरी मुंबईत आल्या. जरीना वहाब यांनी 1974मध्ये प्रदर्शित झालेल्या देव आनंद दिग्दर्शित ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, या चित्रपटातून जरीनाला विशेष ओळख मिळाली नाही.
‘चित्तचोर’मधून जिंकले प्रेक्षकांचे मन!
‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटाला यश मिळाले नसले तरी, त्यांनी मनोरंजन विश्वात काम सुरु ठेवले होते. यानंतर त्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसल्या. 1976साली बासू चॅटर्जी दिग्दर्शित 'चित्तचोर' या चित्रपटात जरीना वहाब यांना मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली. मुख्य अभिनेत्री म्हणून जरीना यांचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात जरीनासोबत अभिनेता अमोल पालेकर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि या चित्रपटातूनच त्यांना खरी ओळख मिळाली.
या चित्रपटानंतर जरीना यांना हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर मिळू लागल्या. त्या 70-80 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक बनल्या. त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. जरीना यांनी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेसह सहाय्यक भूमिकांमध्येही काम केले.
चित्रपटांसह मालिकांमध्येही केले काम
त्यांचे ‘घरोंदा’, ‘सलाम मेमसाब’, ‘सावन को आने दो’, ‘पप्पू’, ‘आखिरी इन्साफ’, ‘पांच कैदी’, ‘दिल मांगे मोर’, ‘रक्त चरित्र’, ‘नायिका’, ‘अग्निपथ’, ‘हिम्मतवाला’, ‘क्लब 60’, ‘जिला गाजियाबाद’, ‘बॉबी जासूस’, ‘स्ट्रीट डांसर 3डी’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. चित्रपटांशिवाय त्या अनेक मालिकांमध्येही झळकल्या. ‘मायका’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘यहा मैं घर घर खेली’, ‘मेरी आवाज ही मेरी पहचान है’ अशा प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही त्या दिसल्या होत्या. 1986 मध्ये आलेल्या 'कलंक का टीका' या चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट आदित्य पांचोलीशी झाली. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले.
हेही वाचा :
Phone Bhoot Release Date: ‘फोन भूत’ चित्रपटाची रिलीज डेट बदलली! प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार!