Shiney Ahuja Birthday : बॉलिवूड अभिनेता शायनी आहुजा (Shiney Ahuja) आज (15 मे) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. शायनीचा जन्म 15 मे 1975 रोजी डेहराडूनमध्ये झाला. एक काळ असा होता की, हा अभिनेता बॉलिवूडमध्ये वेगाने प्रसिद्धी मिळवत होता. आगामी काळात आपल्या अभिनयाने बड्या कलाकारांना पराभूत करून स्वत:चे मोठे स्थान निर्माण करेल, असा विश्वासही त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना वाटत होता. पण, बॉलिवूडच्या या उगवत्या ताऱ्याकडून झालेल्या एका चुकीने त्याचे सर्व काही हिरावून घेतले. बॉलिवूडमधील एक उगवता तारा पार बुडूनच गेला..


शायनी आहुजाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 'हजारों ख्वाहिशे ऐसी' या पहिल्याच चित्रपटातून शायनीने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार देखील मिळाला. त्याकाळात असे म्हटले जात होते की, शायनी आता या इंडस्ट्रीत आपले भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज आहे.


तुरुंगात रवानगी झाली अन्...


पण, या यशादरम्यान, शायनीबद्दल एक अशी बातमी आली, ज्याने संपूर्ण इंडस्ट्रीला हादरवून सोडले. त्याच्यावर घरातील मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. येथून त्याच्या बहरत असलेल्या कारकीर्दीचा शेवट सुरू झाला. बॉलिवूडमध्ये शायनी आहुजा जितक्या वेगाने वर जात होता, तितक्याच वेगाने तो खाली पडला. जेव्हा असे आरोप केले जातात, तेव्हा तुम्ही कितीही मोठे स्टार असाला तरी, तुमच्या पाठीशी कोणीही उभे राहणार नाही.


कमबॅकही ठरले फ्लॉप!


बलात्काराच्या आरोपानंतर शायनी जवळपास दोन वर्षे इंडस्ट्रीतून गायब होता. चाहतेही हळूहळू त्याला विसरून गेले. 2012 मध्ये शायनीने 'भूत' चित्रपटातून पुनरागमन केले, मात्र या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तब्बल दोन वर्षे शायनी पुन्हा दिसला नाही. 2015 मध्ये ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात दिसला, पण त्यानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावरून गायब झाला. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर शायनीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर त्याला जामीन मिळाला. पण, शायनी बॉलिवूडमध्ये पुन्हा कधीही चमकू शकला नाही.


हेही वाचा :