Rakesh Roshan birthday : अभिनेता, दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन (Rakesh Roshan) आज (6 सप्टेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. राकेश रोशन यांचा जन्म 6 सप्टेंबर 1949 रोजी मुंबईत झाला. त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कधी कथा लेखन, कधी अभिनय, कधी दिग्दर्शन तर कधी संगीत दिग्दर्शन सर्वच क्षेत्रात काम करत राकेश रोशन यांनी मोठ्या पडद्यावर आपली खास छाप सोडली आहे.


राकेश रोशनचे वडील रोशन हे बॉलिवूडमधील संगीत दिग्दर्शक होते. तर, राकेश रोशन यांना सुरुवातीपासूनच लेखनाची आवड होती. आधी त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम सुरु केले. नंतर राकेश रोशन यांनी निर्माती-दिग्दर्शन क्षेत्रात हात आजमावला. राकेश रोशन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. 'घर घर की कहानी 'मध्ये राकेश रोशन यांच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. यानंतर राकेश रोशन 'पराया धन', 'जख्मी', 'खानदान', 'हमारी बहू अलका', 'महागुरु' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकले. चित्रपटांमध्ये त्यांनी नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका उत्तमरित्या पार पाडल्या होत्या.


अभिनयसोडून निर्मिती-दिग्दर्शनात प्रवेश


राकेश रोशन यांनी 1980 मध्ये त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले. या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत त्यांनी 'आपके दिवाने' हा चित्रपट बनवला. त्यांचा 'आपके दिवाने' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. पण, पहिल्या अपयशाने राकेश रोशन यांनी हार मानली नाही. त्यानंतर त्यांनी 'कामचोर' हा चित्रपट बनवला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यानंतर त्यांनी 'खून भरी मांग', 'किशन कन्हैया', 'कोयला' आणि 'करण अर्जुन' सारखे चित्रपट केले, जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले.  



‘के’ अक्षर ठरले लकी!


राकेश रोशन 'के' अक्षराला खूप भाग्यवान समजतात. यामुळेच त्यांनी आपल्या सर्व चित्रपटांची नावे 'के'वरून ठेवली. त्यामागचे कारण म्हणजे त्यांचा ज्योतिषावर प्रचंड विश्वास आहे. ‘के’ने चित्रपटाच्या नावाची सुरुवात त्यांच्या ‘खुदगर्ज’ या चित्रपटापासून झाली. यानंतर त्यांचे बहुतेक चित्रपट ‘के’नेच सुरु झाले. 2000 मध्ये, जेव्हा त्यांनी त्यांचा मुलगा हृतिक रोशन याला लाँच केले, तेव्हा त्याच्या चित्रपटाचे नावही ‘के’ वरून अर्थात ‘कहो ना प्यार है’ ठेवले. त्यांचा हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर त्यांनी हृतिकसाठी 'कोई मिल गया', 'क्रिश' सारखे सुपरहिट चित्रपट केले.


‘या’ कारणामुळे कापले केस!


राकेश रोशन यांनी 1987मध्ये ‘खुदगर्ज’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांनी तिरुपतीच्या मंदिरात नवस केला होता की, चित्रपट हिट झाल्यास मुंडन करेन. ‘खुदगर्ज’ हिट झाल्यानंतर राकेश आपला नवस विसरले होते. मात्र, त्यांची पत्नी पिंकी यांनी त्यांना नवसाची आठवण करून दिली. त्यानंतर त्यांनी केसांचा त्याग केला.  


हेही वाचा :


Alia Ranbir Wedding : 'ऋषी कपूर यांची इच्छा पूर्ण होत आहे'; आलिया आणि रणबीर यांच्या लग्नावर राकेश रोशन यांची प्रतिक्रिया
दिग्दर्शक राकेश रोशन यांना कॅन्सरचं निदान