Prem Chopra Birthday : बॉलिवूडचे दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा (Prem Chopra) यांचा जन्म 23 सप्टेंबर 1935 रोजी लाहोरमध्ये झाला होता. प्रेम चोप्रा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या खलनायकी पात्रांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एक वेगळा विस्तार दिला आहे. प्रेम चोप्रा यांनी अनेक चित्रपटांमधून आपल्या उत्कृष्ट खलनायकी व्यक्तिरेखांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण, प्रेम चोप्रा चित्रपटांमध्ये खलनायक भूमिका करण्यामागेही एक खास किस्सा आहे.
प्रेम चोप्रा यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आणि ते नेहमी खलनायकी भूमिका साकारण्यासाठीच ओळखले जातात. प्रेम चोप्रा यांचे कुटुंबाच्या भारत-पाक फाळणीनंतर शिमलामध्ये शिफ्ट झाले होते. प्रेम चोप्रा यांचे शिक्षण इथेच झाले. त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. यादरम्यान ते अनेक नाटकांमध्येही भाग घेत होते. प्रेम चोप्राच्या वडिलांची इच्छा होती की, आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे. परंतु, पदवी शिक्षणानंतर ते अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आले. संघर्षच्या काळात त्यांनी मुंबईत वर्तमानपत्र विकण्याचे कामही केले.
खलनायक म्हणूनच गाजले!
प्रेम चोप्रा (Prem Chopra) यांना 1960मध्ये आलेल्या 'मुड-मुडके ना देख' चित्रपटात पहिली संधी मिळाली होती. यात, भारतभूषण मुख्य अभिनेते होते. प्रेम चोप्रा यांनी काही पंजाबी चित्रपटांमध्येही नायक म्हणून काम केले. याशिवाय, हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी नायक किंवा मध्यवर्ती व्यक्तिरेखा म्हणून काम केले, पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. खलनायक म्हणून मात्र ते खूप गाजले. प्रेम चोप्रा हे बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
एका चित्रपटाने बदललं आयुष्य...
प्रेम चोप्रा यांनी सुरुवातीला काही काळ चित्रपटसृष्टीत संघर्ष केला होता. याच काळात एका व्यक्तीने त्यांची ओळख प्रसिद्ध आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते मेहबूब खान यांच्याशी करून दिली. मेहबूब खानने प्रेम चोप्रा यांना वचन दिले की, ते त्यांना चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका देतील, पण त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. या दरम्यान प्रेम चोप्रा यांना ‘वो कौन थी’ या चित्रपटात खलनायक साकारण्याची संधी चालून आली. प्रेम चोप्रा यांनी ही ऑफर स्वीकारली. हा चित्रपट प्रेम चोप्रा यांच्यासाठी सर्वात हिट ठरला. खलनायकाच्या भूमिकेत प्रेम चोप्रा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर एका दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मेहबूब खान यांची भेट प्रेम चोप्रांशी झाली.
प्रेम चोप्रा (Prem Chopra) यांनी साकारलेला खलनायक मेहबूब खान यांनाही आवडला होता. या भेटीदरम्यान मेहबूब खान यांनी प्रेम चोप्रांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी प्रेम चोप्रा यांना सल्ला देत म्हटले की, तू आता खलनायक इतका उत्कृष्ट साकारलायस की, इतर कोणतीही भूमिका गौण वाटेल. त्यामुळे या पुढे तू खलनायक पात्रचं करायचेस. प्रेम चोप्रा यांनी देखील हा सल्ला मानला आणि खलनायक बनून चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं!
हेही वाचा :
National Cinema Day 2022: राष्ट्रीय चित्रपट दिनी 75 रुपयांमध्ये चित्रपट बघायचाय? असं बुक करा तिकीट