Hariom Movie :  काही दिवसांपूर्वीच 'हरिओम' (Hariom) चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आणि तेव्हापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढू लागली. स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्माला आलेल्या दोन वीर बंधू मावळ्यांची कथा म्हणजेच 'हरिओम'. नव्या पिढीला प्रेरित करणाऱ्या आणि अंधारातून तिमिराकडे नेणाऱ्या 'हरिओम' चित्रपटाची सर्वच आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच 'हरिओम'मधील एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुरु झाले पर्व नवे' असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या सुरेल आवाजाची जोड लाभली आहे. अमोल कोरडे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन स्वरूप मेदरा यांनी केले आहे. 


या चित्रपटात  हरी आणि ओम या दोन मावळ्यांचा रांगडा अवतार तर पाहायला मिळणारच आहे याशिवाय देशप्रेमाने झपाटलेल्या या दोन बंधू मावळ्यांची हळुवार फुलत जाणारी प्रेमकथाही पाहायला मिळणारआहे. त्यांचे हे तरल प्रेम या गाण्यातून व्यक्त होत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात या गाण्याचे चित्रीकरण झाले असून यात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे दिसत आहेत. ओठांवर रेंगाळणारे हे गाणे प्रत्येक प्रेमीयुगुलाला आवडेल असेच आहे. 


पाहा गाणं: 



श्रीहरी स्टुडीओज प्रस्तुत, हरिओम घाडगे निर्मित, आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर दिग्दर्शित 'हरिओम' चित्रपट येत्या  14 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


 निर्माता,अभिनेते हरिओम घाडगे म्हणतात," मी स्वतः कोकणचा पुत्र असल्याने या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे कोकणातील आहे.  चित्रीकरणाची सुरुवातच तान्हाजी मालुसरे यांच्या उमरठ या गावातून झाली आहे. त्यामुळे अ‍ॅक्शनबरोबरच कोकणातील निसर्गसौंदर्यही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.  हा माझा पहिला मराठी चित्रपट असून नव्या पिढीला प्रेरित करणारा हा चित्रपट आहे. अनेक महिन्यांपासून 'हरिओम'च्या प्रदर्शनाची उत्सुकता होती अखेर आता 'हरिओम'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  कोरोना काळात अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट बनवण्यात आला आहे.  महामारीच्या काळात अनेकांना रोजगार देण्याचे काम, काही सामाजिक उपक्रम या चित्रपटाच्या टीमच्या माध्यमातून राबवण्यात आले. आपण समाजाचे काही देणे लागलो, ही एकाच भावना यामागे होती. अथक प्रयत्नानंतर आता 'हरीओम' पूर्णत्वाला आला आहे. प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबियांसोबत हा चित्रपट नक्की पाहा.'


वाचा इतर महत्त्वाची बातमी :


Hariom : 'हरिओम' चा लक्षवेधी मोशन पोस्टर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज