Nagraj Manjule Birthday : ‘सैराट’ म्हटलं की, डोळ्यासमोर येतात ती या चित्रपटातील गाणी, संवाद, कलाकार आणि महत्त्वाचे नाव म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj Manjule). नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने तुफान प्रसिद्धी मिळवलीच, परंतु या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे हे प्रत्येकाच्या ओठी असलेलं नाव झालं. अर्थात या चित्रपटाने त्यांना एका यशाच्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र, नागराज मंजुळे यांचा हा प्रवास सोपा नव्हता. आज (24 ऑगस्ट) नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे.


नागराज पोपटराव मंजुळे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी झाला होता. त्यांची घरची परिस्थिती ही फार बिकट होती. लहानपणापसून नागराज यांना अभ्यासात तसा विशेष रस नव्हता. पण, चित्रपटांची ओढ ही त्यांना बालपणापासूनच होती. अगदी शाळेचे दप्तर लपवून ते मित्रांसोबत चित्रपट पाहायला जायचे, हा किस्सा त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितला होता.



शिक्षणाची गोडी लागली अन्...


घरची परिस्थिती अगदीच बेताची असल्याने नागराज यांच्या कुटुंबातील कुणीही फारसे शिक्षण घेतलेले नव्हते. मात्र, या परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी एम.ए. आणि एम.फील देखील पूर्ण केले. या सगळ्या दरम्यान त्यांना चित्रपटसृष्टी खुणावत होती. याच वेडापायी त्यांनी मास कम्युनिकेशनच्या कोर्समध्ये प्रवेश घेतला. याच दरम्यान प्रोजेक्ट म्हणून त्यांनी ‘पिस्तुल्या’ या लघुपटाची निर्मिती केली. या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.


या दरम्यानच्या काही काळात त्यांचे लक्ष ध्येयावरून भरकटले होते. मात्र, नंतर हे सर्व सोडून ते पुन्हा लिखाण-वाचनाकडे वळले. त्यांना हळूहळू कविता लिहिण्याचा छंदही लागला. त्यांनी आपले शिक्षण देखील पूर्ण केले. चित्रपट निर्मितीचं स्वप्न, तर उराशी बाळगले होते. पण, हातात पैसे नव्हते. अशावेळी त्यांनी रात्री वॉचमनची नोकरी केली. दिवसभर इस्त्री करण्याचे काम केले. आयुष्यातील अनेक अडथळ्यांचा सामना करत आज ते इथवर पोहोचले आहेत. ‘पिस्तुल्या’पासून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास आता अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’पर्यंत येऊन पोहोचला आहे.


वडापाव खाऊन काढले दिवस!


पुण्यात शिकत असताना नागराज यांना घरून डबा यायचा, मात्र, काही दिवस त्यांचा डबा आलाच नाही. रोज हॉटेलमध्ये जाऊन खावे इतके पैसे देखील जवळ नव्हते. मग, त्यांनी आपल्या मित्रासोबत मिळून घरीच काहीना काही बनवून खाण्याची सवय लावली. मात्र, एकदा त्यांचा मित्रही गावी गेला तो बरेच दिवस परत आला नाही. नागराज मंजुळे एकटे पडले होते. शिवाय त्यांना स्वयंपाकातील काहीच येत नव्हते. त्यावेळी तब्बल 6 दिवस ते शेंगदाणा मसाला आणि वडापाव खात होते. यानंतर मात्र त्यांनी आईला फोन केला आणि स्वयंपाकातील काही महत्त्वाचे पदार्थ शिकून घेतले. ही आठवण त्यांनी ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर शेअर केली होती.


अनेक पुरस्कारांवर कोरले नाव


नागराज यांना 2010 मध्ये 'पिस्तुल्या' या लघुपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर 2013मध्ये 'फँड्री' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट चित्रपट हे पुरस्कार मिळाले आहेत. 2016 मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या ‘सैराट’ चित्रपटाला 69व्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लेखन, दिग्दर्शनासह त्यांनी अनेक चित्रपटांमधून अभिनय देखील केला आहे. त्यांच्या याच योगदानामुळं त्यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून D. Litt  देखील बहाल करण्यात आली आहे.


इतर संबंधित बातम्या


पुण्यातील बालसुधारगृहातील मुलांसोबत नागराज मंजुळेंनी Jhund पाहिला!


Nagraj Manjule : झुंड आणि कश्मीर फाइल्सवरुन सोशल मीडियावर मतमतांतर, नागराज मंजुळे म्हणाले..