Mohnish Bahl Birthday : बॉलिवूड अभिनेता मोहनीश बहल (Mohnish Bahl) आज (14 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. मोहनीशचा जन्म 14 ऑगस्ट 1961 रोजी मुंबईत झाला. मोहनीश हा बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांचा मुलगा आहे. मोहनीश बहलने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याला अभिनयाचं बाळकडू हे घरातून मिळालं होतं. अभिनयाची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या मोहनीशला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती.


मोहनीश बहलने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट आणि टीव्ही शो केले, जे सुपरहिट ठरले. मोहनीश बहलने आपल्या करिअरची सुरुवात ‘बेकरार’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटानंतर अभिनेत्याने ‘मेरी अदालत’, ‘पुराना मंदिर’, ‘ये कैसा फर्ज’, ‘इतिहास’, ‘मैने प्यार किया’, ‘बागी’, ‘​​हीना’, ‘डान्सर’, ‘दीवाना’, ‘बोल राधा बोल’, ‘एक ही रिश्ता’, ‘आवरा’, ‘वादा रहा’, ‘तुम मिलो तो सही’, ‘राजा’, ‘हम साथ साथ है’, ‘राजा की आयेगी बारात’, ‘परदेशी बाबू’, ‘ओन्ली यू’, ‘वी आर टुगेदर’, ‘लाइफ हो तो ऐसी’, ‘कहो ना प्यार है’ असे अनेक चित्रपट केले. यातील काही चित्रपट हिट, तर काही फ्लॉप ठरले.



बॉलिवूड सोडण्याचाही केला विचार!


अनेक चित्रपट करूनही मोहनीश बहल याचे बॉलिवूडमध्ये करिअर फारसे उंचावले नाही. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे तो निराशेच्या गर्तेत बुडाला होता. एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याने बॉलिवूड इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत अपयशी ठरत होते, या परिस्थितीमुळे तो नैराश्यात गेला होता. अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यावर मोहनीशला समजले की, आता तो इंडस्ट्रीत फारकाळ टिकू शकणार नाही. त्यावेळी मोहनीशने अभिनय सोडून विमान पायलट होण्यासाठी विशेष तयारी सुरू केली होती. दरम्यान मोहनीश बहल याची भेट अचानक सलमान खानशी झाली. सलमान खानने  'मैने प्यार किया' या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी मोहनीश बहलचे नाव सुचवले. या चित्रपटातील खलनायक व्यक्तिरेखेमुळे मोहनीश पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये चमकू लागला.


लाडका भाऊ आणि खतरनाक खलनायकही!


‘हम साथ साथ है’सारख्या चित्रपटात प्रेमळ मोठ्या भावाची भूमिका साकारणाऱ्या मोहनीश बहलची प्रतिमा तशीच काहीशी बनली होती. मात्र, नंतर त्याने अनेक नकारात्मक भूमिकाही केल्या. मोहनीश बहलने अनेक चित्रपटांमध्ये खलनायक बनून प्रेक्षकांची मने जिंकली. मोहनीश बहलने टीव्ही शोमध्येही अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकले. आजही 'संजीवनी' या टीव्ही शोसाठी मोहनीश बहल लक्षात राहतो.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 14 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या