TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 


'लाल सिंह चड्ढा'च्या कमाईचा आकडा घसरला!


बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, पण आता कलेक्शन पाहता या चित्रपटाला फारशी पसंती मिळत नसल्याचे लक्षात येत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ने पहिल्या दिवशी 12 कोटींचा व्यवसाय केला आहे. 


'बिग बॉस मराठी 4' महेश मांजरेकरच होस्ट करणार


बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसरा सीझन संपल्यापासून प्रेक्षक चौथ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट झाल्याने चौथा सीझन कोण होस्ट करणार आणि कोणते स्पर्धक या सीझनमध्ये सहभागी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. आता कलर्स मराठीने नवा प्रोमो शेअर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'बिग बॉस मराठी 4'च्या सूत्रसंचालनाची धुरा महेश मांजरेकर सांभाळणार आहेत. 


भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लघुपटाची निर्मिती! 


दादर येथील प्लाझा सिनेमाचे हाऊसफुल झालेले प्रिव्हियू थिएटर आणि पत्रकारांसोबतच्या संवादातून झालेले सावरकरांच्या कालजयी विचारांचे जागरण याला निमित्त होते 'कालजयी सावरकर' या लघुपटाचे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष प्रिव्हियू स्क्रिनिंगचे! या कार्यक्रमाला जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. विवेक समूहाची निर्मिती असलेल्या 'कालजयी सावरकर' या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र आणि त्यांचे प्रखर राष्ट्रवादी विचार मांडण्याचा अतिशय स्तुत्य प्रयत्न झाला आहे आणि याचा मला आनंद वाटतो, अशी बोलकी प्रतिक्रिया जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी लघुपट संपल्यानंतर बोलताना दिली.


लोककलावंतांसाठी अजय-अतुल खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ!


'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात अजय-अतुल लोककलावंतांसाठी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळताना दिसणार आहेत.


एका निडर सैनिकाचा जीवन प्रवास मांडणारा 'फौजी'; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


सैनिक देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यामुळे आपण आपलं आयुष्य सुखाने जगू शकतो. कधी कुठे हल्ला झाला किंवा दंगली झाल्या तर आपण खंत व्यक्त करतो. नंतर मात्र अगदी सहज विसरून जातो. आपले सैनिक हातात बंदूक घेऊन कायम आपल्या रक्षणासाठी सतत सीमेवर खंबीरपणे पहारा देत असतात, तेदेखील कोणताही स्वार्थ न ठेवता. अशाच एका निडर सैनिकाचा जीवन प्रवास मांडणारा 'फौजी' हा सिनेमा आहे. 


वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'लाल सिंह चड्ढा'ला मिळाले ऑस्करच्या पेजवर स्थान


बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी होत होती. रिलीजनंतरदेखील हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. दुसरीकडे या सिनेमाला ऑस्करच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर स्थान मिळाले आहे. 


'लाल सिंह चड्ढा'नंतर शाहरुखच्या 'पठाण' सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी


 बॉलिवूडच्या अनेक सिनेमांवर सध्या बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज कोणत्या ना कोणत्या सिनेमावर किंवा कलाकारांवर बहिष्कार टाकला जात आहे. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. अशातच आता शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' सिनेमावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. 


अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांना पाठवले खास गिफ्ट, कुटुंबाने मानले आभार!


 कॉमेडियन राजू श्रीवास्तव सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई लढत आहेत. हृदयविकारच्या तीव्र झटक्यामुळे रुग्णालयात असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आता थोडी सुधारणा झाली आहे. मात्र, अद्याप त्यांना शुद्ध आलेली नाही. त्यांना शुद्धीवर यायला थोडा वेळ लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारही राजू श्रीवास्तव यांना लवकर बरे वाटावे म्हणून त्यांना शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्यासाठी काहीतरी खास पाठवले आहे.


भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल


सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल यांनी आमिर खानविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदाल यांनी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाबाबत तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदाल म्हणाले की, या चित्रपटाने लष्कराचा अपमान केला असून, हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. विनीत यांनी आमिर खान, चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि पॅरामाउंट पिक्चर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे.


'समायरा'तील 'आला रे हरी आला रे' अभंग प्रेक्षकांच्या भेटीला


पंढरीचा वास, चंद्रभागेचे स्थान आणि विठोबाच्या दर्शनाची आस, जिथे एकत्र येते ती म्हणजे पंढरीची वारी. याच वारीचा आभास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे, वारकऱ्यांमध्ये आणि विठ्ठलामध्ये असणाऱ्या जिव्हाळ्यावर भाष्य करणारे निहार शेंबेकर संगीत दिग्दर्शित 'समायरा' सिनेमातील 'आला रे हरी आला रे' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.