Manoj Kumar Birthday : बॉलिवूड विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते झाले, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अशाच काही कलाकारांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar). आपल्या दमदार अभिनयाने मनोज कुमार यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आज (24 जुलै) अभिनेते मनोज कुमार आपला 85वा वाढदिवस साजरा करत आहेत. मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे झाला.
भारत-पाकिस्तान फाळणीमुळे वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीत येऊन स्थायिक झाले. मनोज कुमार यांचे शिक्षण दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून पूर्ण झाले. त्यांचे कुटुंब दिल्लीतील विजय नगर निर्वासित कॅम्पमध्ये राहत होते, त्यानंतर ते जुन्या राजेंद्र नगर भागात स्थलांतरित झाले. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. लहानपणापासूनच त्यांना मनोरंजन विश्व खुणावत होते. मनोज कुमार यांनी लहानपणी दिलीप कुमार स्टारर 'शबनम' हा चित्रपट पाहिला होता आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनयाच्या वेडापायी ते मुंबईत आले.
निनावी लेखक ते अभिनेता...
मुंबईत आल्यावर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी लेखनाचे काम केले, त्यातून त्यांना पैसे मिळायचे. 1960मध्ये आलेल्या 'कांच की गुडिया' या चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणून भूमिका साकारली होती. यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमधून दिसले. 1962मध्ये ते ‘हरियाली और रास्ता’मध्ये झळकले. या चित्रपटात त्यांच्यासोबत माला सिन्हा मुख्य भूमिकेत होती. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. 1964मध्ये त्यांचा आणखी एक सुपरहिट चित्रपट ‘वो कौन थी’ प्रदर्शित झाला. 1974च्या ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटानंतर मनोज कुमार त्यांच्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर पोहोचले. यानंतर त्यांच्याकडे चित्रपटाच्या रांगा लागू लागल्या. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले.
1965मध्ये प्रदर्शित झालेला ‘शहीद’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गणला जातो. या देशभक्तीपर चित्रपटात त्यांनी भगत सिंह यांची भूमिका साकारली होती. यानंतर आलेल्या ‘उपकार’ या चित्रपटात ते एका शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. 1970मध्ये त्यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेला ‘पूरब और पश्चिम’ हा चित्रपटदेखील सुपरहिट ठरला. या चित्रपटातलं ‘भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ’ हे गाणं प्रचंड गाजलं.
... म्हणून बदललं नाव!
चित्रपट विश्वात आल्यानंतर मनोज कुमार यांनी आपले नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामीवरून बदलून मनोज कुमार केले. याचे कारण होते अभिनेते दिलीप कुमार. लहानपणी दिलीप कुमार यांच्या चित्रपटांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला होता. ते दिलीप कुमार यांचे चाहते बनले होते. ‘शबनम’ या चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव मनोज कुमार होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला होता की, जर चित्रपटात काम केले तर, स्वतःचे नाव मनोज कुमाराच ठेवू.
भारत कुमार म्हणून ओळख
बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव भारत होते. त्यामुळे लोक त्यांना ‘भारत कुमार’ म्हणू लागले. एवढेच नाही, तर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे देखील मनोज कुमार यांच्या चाहत्यांपैकी एक होते. 1965च्या भारत-पाक युद्धानंतर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मनोज यांना 'जय जवान, जय किसान'वर चित्रपट बनवण्याची कल्पना दिली आणि त्यानंतर मनोज कुमार यांनी 'उपकार' चित्रपट बनवला.
मानाच्या पुरस्कारांवर कोरले नाव
'वो कौन थी', 'शहीद', 'हरियाली और रास्ता', 'हिमालय की गोद में', 'गुमनाम', 'पत्थर के सनम', 'उपकार', 'क्रांति', 'रोटी कपड़ और मकान', 'पूरब और पश्चिम' यांसारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या मनोज कुमार यांनी अनेक मानाच्या पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. मनोज कुमार यांना 1972मध्ये ‘बेईमान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 1975मध्ये ‘रोटी कपडा और मकान’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. 1992मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. मनोज कुमार यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबदल दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
हेही वाचा :