Mahima Chaudhry : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) आज (13 सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. महिमा चौधरीचा जन्म 13 सप्टेंबर 1973 रोजी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला. महिमा चौधरीचे खरे नाव रितू चौधरी आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर नाव बदलून ‘महिमा चौधरी’ असे केले. महिमा चौधरीने डाऊन हिल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लोरेटो कॉलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केले. 1990 मध्ये तिने आपले शिक्षण सोडून मॉडेलिंगच्या जगात नशीब आजमावले. मॉडेलिंग करिअरमध्ये तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले. यानंतर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.


जाहिरात क्षेत्रातून महिमाने मनोरंजन क्षेत्रात पाउल टाकलं. मॉडेलिंग कारकिर्दीत ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली. महिमा चौधरीने अभिनेता आमिर खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत पेप्सीची जाहिरात केली होती, जी त्या काळात खूप लोकप्रिय झाली. यानंतर तिने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.


'परदेस’मधून बॉलिवूड पदार्पण


अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) हिला प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी चित्रपटांमध्ये पहिली संधी दिली होती. ती एका म्युझिक चॅनलमध्ये व्हीजे (व्हिडिओ जॉकी) म्हणून काम करायची. महिमा चौधरीला या शोमध्ये पाहिल्यानंतर सुभाष घई यांनी तिला ‘परदेस’ या चित्रपटासाठी साईन केले. हा चित्रपट 1997मध्ये प्रदर्शित झाला होता. जो हिट ठरला. पहिल्याच चित्रपटात महिमा चौधरीची जोडी अभिनेता शाहरुख खानसोबत दिसली होती.


पहिल्याच चित्रपटासाठी पुरस्कार


‘परदेस’मध्ये सुपरस्टार शाहरुख खान, महिमा चौधरी आणि अपूर्व अग्निहोत्री मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटामुळे महिमा चौधरीचे नशीब रातोरात चमकले होते. याच दरम्यानच्या काळात महिमा चौधरीने 1990 मध्ये ‘मिस इंडिया’ ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती, याशिवाय ती मॉडेलिंग देखील करत असे, परंतु तिला प्रसिद्धी 'परदेस' चित्रपटातून मिळाली. या चित्रपटातील तिचे पात्र इतके गाजले की, तिला ‘परदेस’साठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.


सुपरहिट चित्रपटांमध्ये काम


महिमा चौधरी (Mahima Chaudhry) ही 1990 आणि 2000च्या दशकातील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होती. 'परदेस' व्यतिरिक्त 'प्यार कोई खेल नहीं', 'बागवान', 'खिलाडी 420', 'दाग द फायर', 'दिल है तुम्हारा' आणि 'धडकन' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.


कॅन्सरला मात देऊन पुन्हा कामावर


कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटातून महिमा चौधरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटातील महिमा चौधरीचा लूकही समोर आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रसिद्ध लेखक पुपुल जयकर यांची भूमिका साकारत आहे. महिमाचा लूक हुबेहूब पुपुल जयकरसारखा आहे. कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर महिमा या चित्रपटातून पहिल्यांदाच पडद्यावर परतणार आहे.


हेही वाचा :


Emergency : 'इमर्जन्सी' चित्रपटात महिमा चौधरीची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका


Mahima Chaudhry : महिमा चौधरीची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडीओ