Kiccha Sudeep Birthday : चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) हा दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरहिट स्टार्सपैकी एक आहे. आज (2 सप्टेंबर) अभिनेता किच्चा सुदीप याचा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 2 सप्टेंबर 1973 रोजी कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला. किच्चा सुदीपने आपल्या दमदार अभिनयाने कन्नड मनोरंजन विश्व गाजवले आहे. केवळ साऊथच नव्हे, तर तो अनेक हिंदी चित्रपटांमध्येही झळकला आहे. सलमान खानच्या ‘दबंग 3’ चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय त्याचा ‘मक्खी’ हा चित्रपटही खूप गाजला होता.


शिक्षण पूर्ण केल्यानंतर, किच्चा सुदीपने मुंबई गाठली. मुंबईत त्याने रोशन तनेजा अॅक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या आयुष्यात अशीही एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याला आर्थिक संकटाशी सामना करावा लागला होता.


इंजिनीअर अन् क्रिकेटर देखील...


अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) हा एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. त्याच्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. त्यामुळे आपल्या मुलानेही अशाच एखाद्या क्षेत्रात काम करावे, अशी कुटुंबाची इच्छा होती. किच्चा सुदीप याने दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. पण, अभिनयाची आवड असल्याने त्याने इंजिनिअरिंग सोडून मनोरंजन विश्वाची निवड केली. तो एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. कॉलेजमध्ये असताना तो अनेक क्रिकेट सामने देखील खेळला आहे.


मालिकाविश्वातही केलेय काम


किच्चा सुदीपने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्याने 'प्रेमदा कादंबरी' या टीव्ही सीरियलमध्ये काम केले आहे. या मालिकेतील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर 1997मध्ये रिलीज झालेल्या 'थैवा' चित्रपटातून तो मुख्य अभिनेता म्हणून नावारूपास आला. त्यानंतर 2001 मध्ये सुदीपने 'हुच्छा' या हिट चित्रपटात काम केले. सुदीपला 'हुच्छा', 'नंदी' आणि 'स्वाती मुथ्यम' या चित्रपटांसाठी सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.


बिकट परिस्थितीशीही लढला!


अभिनेत्याच्या आयुष्यात एकदा अशीही वेळ आली होती, जेव्हा त्याच्याकडे अवघे 500 रुपये शिल्लक होते. संघर्षाच्या दिवसांत आर्थिक परिस्थिती ठीक नसतानाही त्याने हिंमत सोडली नाही. सतत मेहनत करत तो आज साऊथमधील टॉपचा अभिनेता बनला आहे. 2008मध्ये त्याने 'फुंक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘रण’, ‘फूंक 2’ आणि ‘रक्तचरित्र’ या चित्रपटांमध्येही किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) झळकला आहे. सुदीप 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचे कन्नड व्हर्जन होस्ट करतो.


हेही वाचा: