Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20 मे) आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 20 मे 1983 रोजी हैदराबाद येथे झाला. अभिनेत्याचे आजोबा एनटी रामाराव हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. इतकेच नाही तर, ते त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेतेही होते. यामुळे त्यांच्या नातवाला ज्युनियर एनटीआर म्हणून ओळखले जाते. ज्युनियर एनटीआरची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. यात केवळ साऊथ इंडस्ट्रीतील चाहतेच नाही, तर हिंदी प्रेक्षकांचाही समावेश आहे. त्याचे चित्रपट लोकांना खूप आवडतात.
ज्युनियर एनटीआरने 1991 मध्ये 'ब्रह्मर्षी विश्वामित्र' या चित्रपटामधून बालकलाकार पदार्पण केले होते. 1996मध्ये आलेल्या दक्षिण भारतीय चित्रपट 'रामायणम'मध्ये त्यांनी भगवान रामाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2001 मध्ये ज्युनियर एनटीआरने 'स्टुडंट नंबर 1' मधून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. यानंतर त्याने साऊथ मनोरंजन विश्वात एकापेक्षा एक चित्रपट केले. तसेच, तेलुगु रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ होस्ट केल्याने तो प्रचंड चर्चेत आला होता.
सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता!
आजघडीला ज्युनियर एनटीआरचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि महागड्या अभिनेत्यांच्या यादीत सामील झाले आहे. तो साऊथचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. अभिनेता त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी 20 ते 25 कोटी रुपये फी आकारतो. ज्युनियर एनटीआरने आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम साध्य केले. त्याला टॉलीवूडचा सलमान खान देखील म्हटले जाते. ज्युनियर एनटीआर चित्रपटांमध्ये एकही टेक न घेता डान्स सीक्वेन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, ज्युनियर एनटीआरने 2011 मध्ये रिअल इस्टेट व्यावसायिक श्रीनिवास यांची मुलगी लक्ष्मी प्रणती हिच्याशी लग्न केले. दोघांचे लग्न झाले तेव्हा लक्ष्मी केवळ 17 वर्षांची होती.
बालविवाहामुळे आला होता अडचणीत!
या लग्नामुळे ज्युनियर एनटीआर मोठ्या वादात सापडला होता. त्याच्याविरुद्ध बालविवाह कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याने लक्ष्मीची 18 वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहिली आणि त्यानंतर पुन्हा लग्न केले. आता या जोडीला दोन मुले आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ज्युनियर एनटीआर नुकताच एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट देखील दिसले आहेत. या चित्रपटाने देशातच नव्हे, तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
हेही वाचा :
- Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’
- Cannes Film Festival 2022: लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान
- Happy Birthday Nawazuddin Siddiqui : कधीकाळी वॉचमनचे काम केले, दारोदारी मसाले विकले! आता बॉलिवूडवर राज्य करतोय नवाजुद्दीन सिद्दीकी!