Genelia D’Souza Birthday : बॉलिवूडची क्युट अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D’Souza) आज (5 ऑगस्ट) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. जिनिलिया डिसूजा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात क्युट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला तिच्या गोड हास्यामुळे मॉडेलिंग विश्वात वाहवा मिळाली होती. फार कमी वेळात जिनिलिया डिसूजाने भारतातील अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. अभिनेत्रीचे सर्वच चित्रपट जवळपास हिट ठरले. जिनिलियाने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
जिनिलियाने तिच्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान मॉडेलिंगमध्ये करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी ती अवघ्या 15 वर्षांची होती. मॉडेलिंगदरम्यानच तिला बॉलिवूड चित्रपटाची ऑफरही आली. जिनिलियाने 2003मध्ये वयाच्या 21व्या वर्षी रितेश देशमुखसोबत (Riteish Deshmukh) 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तिने मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिली जाहिरात!
जिनिलिया डिसूजाला वयाच्या 15व्या वर्षी मॉडेलिंगची पहिली ऑफर मिळाली, ज्यामध्ये तिला पार्कर पेनच्या जाहिरातीत काम करायचे होते. या जाहिरातीत तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत पारकर पेनची जाहिरात करायची होती. दरम्यान ती मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय झाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पहिला चित्रपट स्वीकारला. 2003मध्ये तिला ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पहिलाच हिंदी चित्रपट हिट झाल्यानंतर जिनिलियाला तमिळ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले.
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जाने तू या जाने ना' या हिंदी चित्रपटाद्वारे जिनिलिया डिसूजाने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली. यानंतर त्याने 'चान्स पे डान्स', 'फोर्स', 'तेरे नाल लव हो गया', 'जय हो' सारख्या चित्रपटात तिने काम केले. 2018मध्ये जिनिलिया 'माऊली' या मराठी चित्रपटातून निर्मातीही बनली. 2006 मध्ये 'बोमारिल्लू' या तेलुगू चित्रपटासाठी तिने पहिला 'फिल्मफेअर अवॉर्ड' जिंकला. जिनिलियाची सर्वात खास गोष्ट म्हणजे अभिनेत्री असण्यासोबतच ती राज्यस्तरीय खेळाडू आणि राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू देखील आहे.
रितेशसोबत जमली जोडी
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा यांची पहिली भेट 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. दोघांमध्ये अनेक गोष्टी शेअर होऊ लागल्या, अशा प्रकारे दोघांमधील बॉन्डिंग वाढतच गेले आणि काही काळानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 10 वर्षांच्या डेटिंगनंतर 2012मध्ये रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा यांनी लग्न केले. जिनिलिया आणि रितेश यांना रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत. रितेश आणि जिनिलिया यांची गणना बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी जोडप्यांमध्ये केली जाते.
हेही वाचा :
Genelia D'Souzaचा बॉसी अवतार; रितेश देशमुख सोबत दिसतेय खास!
Genelia D'Souza: जेनेलिया डिसूझा लवकरच दिसणार 'मिस्टर मम्मी' सिनेमात!