Chiranjeevi Birthday : साऊथ इंडस्ट्रीतील मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) या लोकप्रियता केवळ देशातच नव्हे तर परदेशातही पसरलेली आहे. आज (22 ऑगस्ट), साऊथचा हा सुपरस्टार अर्थात अभिनेते चिरंजीवी आपला 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘हिरो’, ‘चॅलेंज’, ‘इंद्रा’ आणि ‘खून का रिश्ता’ यांसारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. चिरंजीवी अशा कुटुंबातून आहेत, ज्यांच्या पिढ्यानपिढ्या मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. आपल्या कुटुंबियांप्रमाणे त्यांनीही अभिनय क्षेत्र निवडले.


अभिनेता चिरंजीवी यांचा जन्म 22 ऑगस्ट 1955 रोजी भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील मोगलाथूर या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव अंजना देवी आणि वडिलांचे नाव कोनिडेला व्यंकट राव आहे. चिरंजीवी यांचे खरे नाव कोनिडेला शिव शंकर प्रसाद होते. हे नाव त्यांच्या वडिलांनी ठेवले होते. पण, चिरंजीवीचे कुटुंब सुरुवातीपासूनच हनुमानाचे मोठे भक्त आहे, त्यामुळे त्यांच्या आईने हे नाव बदलून 'चिरंजीवी' करण्याचा सल्ला दिला होता. भगवान हनुमानाला अमर अर्थात चिरंजीवी मानले जाते. आपल्या आईच्या सल्ल्यानुसार, अभिनेत्याने आपले नाव कोनिडेला शिवशंकर प्रसादवरून बदलून चिरंजीवी केले.


150हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम!


नरसापूरच्या श्री वायएन कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर चिरंजीवी यांनी फिल्मी दुनियेत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1976मध्ये त्यांनी चेन्नईच्या मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. ‘प्रणम खरीदु’ हा चिरंजीवी यांचा पहिला चित्रपट होता, जो 1978मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु, या अभिनेत्याने पुनाधिरल्लू (1978) या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले होते. पण काही कारणांमुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले आणि एक वर्षानंतर हा चित्रपट 1979मध्ये प्रदर्शित झाला. अशा प्रकारे ‘प्रणाम खरेदु’ हा चिरंजीवी यांचा पहिला चित्रपट ठरला. चिरंजीवीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 150 हून अधिक चित्रपट केले आहेत.


अभिनेत्याबद्दल ‘या’ खास गोष्टी माहितीयेत का?


लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे 1987 मध्ये पार पडलेल्या 59व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर) आमंत्रित करण्यात आलेले पहिले दक्षिण भारतीय म्हणून चिरंजीवी यांचे नाव घेतले जाते. चिरंजीवी यान साऊथ फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत तब्बल सात पुरस्कार मिळाले आहेत. तेलुगू चित्रपटसृष्टीत या श्रेणीत सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे ते पहिले अभिनेते आहेत. चिरंजीवी यांच्याकडे डॉक्टरेटची पदवीही आहे. अभिनय विश्वातील अमुल्य योगदानासाठी त्यांना आंध्र विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पुरस्काराने सन्मानित केले आहे.


हेही वाचा :


Godfather Teaser Out : चिरंजीवीच्या 'गॉडफादर'चा टीझर आऊट; स्टंट करताना दिसला भाईजान


Godfather Teaser Video : सुपरस्टार चिरंजीवीच्या चित्रपटातून सलमान खान करणार साऊथ डेब्यू