Adnan Sami Birthday : लोकप्रिय गायक अदनान सामी (Adnan Sami) आज (15 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अदनान बराच काळ पाकिस्तानात राहत होता आणि आता त्याने भारतीय नागरिकत्व स्वीकारले असून, तो भारतात स्थायिक झाला आहे. जगातील सर्वात वेगवान पियानो वाजवण्याची कला आत्मसाद असलेला अदनान सामी हा एक उत्तम गायक असून त्याचे नाव अनेकदा चर्चेत असतेच, मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तो चर्चेचा भाग बनतो.
अदनानचा जन्म 1971 मध्ये लाहोरमध्ये झाला. मात्र, तो लहानाचा मोठा लंडनमध्ये झाला आणि तिथूनच त्याने शिक्षण घेतले. अदनानचे वडील पाकिस्तानी लष्करात स्क्वाड्रन लीडरच्या पदावर कार्यरत होते. 1965 मध्ये भारत-पाक युद्धात ते फ्लाईट लेफ्टनंट म्हणून सामील झाले होते. वयाच्या पाचव्या वर्षापासून सर्वोत्तम पियानो वाजवणारा अदनान आजघडीला 35हून अधिक वाद्य वाजवतो.
वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी कारकिर्दीची सुरुवात!
अदनानने पहिल्यांदा संगीत दिले, तेव्हा तो फक्त नऊ वर्षांचा होता. 1986मध्ये त्याने आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून सतत तो यशाची शिडी चढत राहिली. अदनान सामीचे व्यावसायिक जीवन जितके यशस्वी होते, तितकेच त्याचे वैयक्तिक जीवन चढ-उतारांनी भरलेले होते. कधीकाळी अदनानचे वजन 230 किलो होते. पण, आता वजन कमी करून तो फिट झाला आहे.
चार वेळा बांधली लग्नगाठ!
अदनान सामीने 1993मध्ये जेबा बख्तियारशी पहिले लग्न केले होते. अदनानला जेबापासून एक मुलगा आहे, ज्याचे नाव त्याने अजान सामी खान ठेवले आहे. मात्र, या दोघांनी अवघ्या 3 वर्षांनंतर वेगळे होण्याची घोषणा केली. यानंतर अदनान सामी पुन्हा सिंगल झाला. पण, 2001 मध्ये दुबईच्या अरब सबाह गलदारीसोबत त्याचे नाव जोडले गेले. अदनान सामी आणि सबा या दोघांचे हे दुसरे लग्न होते. अदनानप्रमाणेच सबालाही पहिल्या लग्नापासून एक मुलगा झाला होता. मात्र, त्याचं हे नातं देखील फार काळ टिकलं नाही. अदनान सामीचे दुसरे लग्न केवळ दीड वर्ष टिकले. दोघांचा घटस्फोट झाला आणि अदनान सामी पुन्हा एकदा आयुष्याच्या प्रवासात एकटा पडला.
मात्र, 2008 मध्ये, त्याने पुन्हा एकदा सबासोबत लग्न केले. सबा मुंबईत आली, दोघे एकत्र राहू लागले, पुन्हा लग्न केले, पण वर्षभरानंतर दोघांनी पुन्हा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सबाने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि दोघे वेगळे झाले. 2010 मध्ये अदनान सामीने रोया सामी खानशी लग्न केले. रोया एका निवृत्त लष्करी जनरलची मुलगी होती. रोयासोबत त्याची पहिली भेट 2010मध्ये झाली आणि काही काळानंतर अदनानने तिला प्रपोज केले. या लग्नापासून त्यांना एक मुलगी झाली, तिचे नाव त्यांनी मदिना सामी खान ठेवले आहे.
पाकिस्तानी असूनही अदनाने भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार त्याने भारतीय नागरिकत्व देखील स्वीकारले. त्याच्या गायन कारकीर्दीमुळे त्याला पद्मश्रीने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा:
Adnan Sami : अदनान सामीचा सोशल मीडियाला रामराम? ‘अलविदा’ पोस्टमुळे चाहते संभ्रमात!