Independence Day 2022 Special : भारताच्या स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 75व्या वर्षी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने सरकारच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ सारखा मोठा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा जल्लोषात देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात मनोरंजन विश्व कसं बरं मागे राहील? स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने टीव्हीवर अनेक देशभक्तीपर चित्रपट दाखवले जातात. इतकचं नाही तर, बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट निर्मित झाले आहेत, जे पाहणाऱ्या दर्शकाच्या मनात देशप्रेम जागृत करतात. चला तर, जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल...


बॉर्डर


‘संदेसे आते है...’ या गाण्याने प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणणारा जेपी दत्ता यांचा हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात सैनिकांची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट आजही पहिल्या दिवसाप्रमाणेच लोकप्रिय आहे. ‘बॉर्डर’मध्ये सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले होते. आपल्या देशासाठी लढणाऱ्या सैन्याचे बलिदान पाहून प्रत्येकाच्या मनात देशप्रेम जागृत होते.


उरी: सर्जिकल स्ट्राईक


2016 मध्ये पाकिस्तानच्या उरी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सर्जिकल स्ट्राईकवर 2019 साली चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. उरी हल्ल्याच्या थरार या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.


भुज: द प्राईड ऑफ इंडिया


बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर, एमी विर्क आणि नोरा फतेही मल्टीस्टारर चित्रपट ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटात 1971मध्ये भारतीय हवाई दलाच्या भुज विमानतळाचे प्रभारी असलेले स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक, अनेक आव्हानांना तोंड देत माधापूरमधील एका गावातील सुमारे 300 महिलांच्या मदतीने खराब झालेला टेक ऑफ ट्रॅकची पुनर्रचना करताना दाखवले आहेत.  


शेरशाह


परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कारगिल युद्धादरम्यान भारतीय जवानांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते, त्यात विक्रम बत्रा हे देखील सामील होते. ‘शेरशाह’मध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा​ आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत झळकले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता.


राझी


मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ हा चित्रपट आलिया भट्टच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वात उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानला जातो. ‘कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट सेहमत खान या तरुण काश्मिरी मुलीची प्रेरणादायी कथा आहे, जी इक्बाल सय्यद या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करते आणि भारतीय गुप्तहेर बनून पाकिस्तानात जाते. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या या मुलीची कथा खूप प्रेरणादायी होती.


हेही वाचा :