Goshta Eka Paithanichi : '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार'  (68th National Film Awards 2022) पुरस्कार सोहळ्यात बाजी मारलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाचा आज सिंगापूरमध्ये प्रिमीअर शो पार पडला आहे. 


'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळल्याने शंतनू रोडेने खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. शंतनुने लिहिलं आहे,"आज आपल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा, ‘गोष्ट एका पैठणीची’ चा सिंगापूर ला प्रिमीअर शो आहे...आपल्याकडे हा चित्रपट 2 डिसेंबर ला रिलीज होणार आहे..आपले प्रेम, शुभेच्छा आणि आशिर्वाद नेहमी असू द्या". 


पैठणीची गोष्ट दोन डिसेंबरला ऐकायला मिळणार


'गोष्ट एका पैठणीची' हा बहुचर्चित सिनेमा येत्या दोन डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा शंतनू रोडेने सांभाळली आहे. या सिनेमात सायली संजीव, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, सुव्रत जोशी, आदिती द्रविड आणि मृणाल कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.



'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमात भोर तालुक्यातील कर्नावडी गावातील एक साधी गृहिणी सायलीने साकारली आहे. प्रेमळपणे घर जपणारी आणि वेळप्रसंगी खंबीरदेखील होणारी सायली या सिनेमात पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाल्याने प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत आहेत. 'गोष्ट एका पैठणीची' सारखे दर्जेदार सिनेमे नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. विदेशातील सिने-पेक्षकांनादेखील हा सिनेमा पसंत पडत आहे. आता भारतीय सिनेप्रेमींना 'गोष्ट एका पैठणीची'चे वेध लागले आहेत.


'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमावर भाष्य करताना शंतनू रोडे म्हणाला,"गोष्ट एका पैठणीची' हा सिनेमा माझ्या खूप जवळचा आहे. एका छोट्याशा गावात घडणारी ही गोड कथा आहे. सिनेमा बनवला तेव्हा हा सिनेमा राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारेल, याची जराही कल्पना नव्हती. प्रत्येक जण आपल्या उराशी एक स्वप्न बाळगून असतो आणि त्या स्वप्नांनाची पूर्तता करणारा हा नक्षीदार प्रवास म्हणजे 'गोष्ट एका पैठणीची'. 


संबंधित बातम्या


Shantanu Rode : मनोरंजनक्षेत्रात संघर्ष करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी प्रवास; सुधीर मुनगंटीवारांनी शंतनु रोडेला लिहिलं खास पत्र