मुंबई: आपल्या जादुई आवाजानं अनेक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायक मुकेश यांची आज 93 वी जयंती आहे. याचनिमित्तान गुगलनं त्यांचं डुडल तयार करुन त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.


 

दोस्त-दोस्त ना रहा', 'जीना यहां मरना यहां', 'कहता है जोकर', 'दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई', 'आवारा हूं', 'मेरा जूता है जापानी' यासारखी अनेक अजरामर गाणी मुकेश यांनी गायली आहेत.

 



 

40 वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीत मुकेश यांनी तब्बल 200 हून अधिक सिनेमात गाणी गायली आहेत. 1959 साली 'अनाडी' सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आला होता. सुरुवातीला राजकपूर यांचा आवाज अशी ओळख बनलेले मुकेश हळुहळू त्यातून बाहेर पडू लागले आणि त्यानंतर त्यांनी एक नवा इतिहास रचला.

 



 

22 जुलै 1923ला लुधियानातील जोरावर चंद माथुर आणि चांद रानी यांच्या घरात मुकेश यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच मुकेश यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. 1941 साली त्यांना निर्दोष सिनेमातून ब्रेक मिळाला.

 



 

60च्या दशकात मुकेश हे कारकिर्दीच्या यशोशिखरावर विराजमान होते. त्यावेळच्या अनेक बड्या अभिनेत्यांना त्यांनी आवाज दिला होता. मुकेश यांनी आपल्या कारकिर्दीतील शेवटचं गाणं आपला मित्र राज कपूर यांच्या सिनेमासाठी गायलं होतं. मात्र, 1978 साली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं  निधन झालं.