नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना रविवारी चित्रपट क्षेत्रातील अत्यंत मानाच्या 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी 'हा पुरस्कार देऊन मला निवृत्तीचे संकेत तर दिले जात नाहीत ना, अशी शंका आली. पण मला अजून खूप काम करायचयं,' अशा शब्दात अमिताभ यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी बच्चन कुटुंबीयांसह दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली.


बच्चन यांनी आजवर बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या बहारदार अभिनयाच्या जोरावर बच्चन यांना आतापर्यंत अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 'सात हिंदुस्थानी' या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. गेल्या 50 वर्षांमध्ये बच्चन यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार, बहुमान आपल्या नावे केले आहेत. आता त्यांचा सन्मान सिनेक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे.

बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. आपल्या कारकिर्दीत बिग बींनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांचे चाहते नेहमीच त्यांच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत असतात. सध्या त्यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा रिअॅलिटी शो टीव्हीवर सुरु आहे, त्यालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या जंजीर, शोले, डॉन, त्रिशुल, अग्निपथ, ब्लॅक, सरकार, निःशब्द, चीनी कम, पा आणि पिकू यांसारख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
दादासाहेब फाळके पुरस्कार -
चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी 1969 पासून 'दादासाहेब फाळके पुरस्कार' देण्याची सुरुवात झाली. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाळके यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. 10 लाख रुपये रोख, शाल आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

हेही वाचा - मायनस 3 डिग्री तापमानात हिमाचलमध्ये शुटिंग करतायेत बिग बी; ट्वीट करत सांगितला अनुभव

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार | ABP Majha