Jitendra Joshi : मराठी सिनेसृष्टीसाठी एक आनंदाची बाब आहे. कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर 'गोदावरी' (Godavari) सिनेमाची आता 'न्यूयॅार्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल'च्या (NYIFF) ओपनिंग फिल्ममध्ये सिनेमाची निवड करण्यात आली होती. आता या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या जितेंद्र जोशीला (Jitendra Joshi) 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2022' मध्ये सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिओ स्टुडिओजच्या बहुप्रतीक्षित 'गोदावरी' सिनेमाने जगभरातील अनेक नामांकित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपलं नाव कामवालं आहे. अशातच आता जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाल्याने 'गोदावरी'च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अनेक पुरस्कार सोहळ्यात गौरवलेला 'गोदावरी' सिनेमा
'गोदावरी' सिनेमाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 'इफ्फी 2021' मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शनातील विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महाजन यांनी पटकावला आहे. तर 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'गोदावरी' या सिनेमाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. 'वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मध्ये वर्ल्ड प्रीमिअर आणि 'न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये 'एशिया पॅसिफिक प्रीमिअर'ही दाखवण्यात आला आहे. 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
गोदावरी सिनेमासंदर्भात दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाले,'गोदावरी' या सिनेमाला जगभरातून अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झाल्यानंतर आता नामांकित अशा कान्स चित्रपट महोत्सवात स्क्रिनिंगसाठी निवडलेल्या पहिल्या पाच चित्रपटांमध्ये 'गोदावरी'चा समावेश करण्यात आला आहे. आयुष्य आणि मृत्य यांच्यातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न 'गोदावरी'मध्ये करण्यात आला आहे. आता जितेंद्र जोशीला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाल्याने मला आनंद होत आहे."
तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा
जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित, निखिल महाजन दिग्दर्शित या सिनेमात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संबंधित बातम्या