Gargi Nilu Phule Joins NCP : गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार राजकारणात एन्ट्री करत आहेत. आता अभिनेते निळू फुले यांची लेक, अभिनेत्री गार्गी फुले (Gargi Nilu Phule) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गार्गी फुले म्हणाल्या,"खूप दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी हो म्हटलं. राष्ट्रवादी पक्षाची जी विचारसरणी आणि विचार आहेत. त्याचविचारसरणीचे माझे बाबा निळू फुले होते. त्यामुळे माझ्या वडिलांचे जे विचार होते. त्या विचारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस न्याय देईल".
मुख्य प्रवाहात येऊन काम करायचं मी ठरवलं आहे : गार्गी फुले
गार्गी फुले पुढे म्हणाल्या,"राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा मला आनंद आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबत वडिलांचे चांगले संबंध आहेत. आता पक्षासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येऊन प्रवाहात येईल. आता नुसतं किनाऱ्यावर बसून पाहायचं नाही आहे. मुख्य प्रवाहात येऊन काम करायचं मी ठरवलं आहे. तरुणांना वाटतं राजकारणात यावं आणि बदल व्हावा त्यानुसार माझा सुद्धा प्रयत्न असेल. भविष्यात पक्षाने तिकीट दिलं तर का नाही लढणार?".
गार्गी फुले यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who Is Gargi Phule)
गार्गी फुले यांनी स्त्रीमुक्ती या विषयात पदवी घेतली आहे. अभिनयाचं बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालं आहे. 1998 साली प्रायोगिक नाटकाच्या माध्यमातून त्या मनोरंजनसृष्टीसोबत जोडल्या गेल्या. सत्यदेव दुबे यांच्याकडे त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं. समन्वय या नाट्यसंस्थेच्या अनेक प्रायोगिक नाटकात गार्गी फुले यांनी काम केलं आहे.
गार्गी फुले यांनी मराठी मालिका, सिनेमे, नाटक आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. मळभ, कोवळी उन्हे, श्रीमंत, वासंती जीर्णनी, सुदामा के चावल, सोनाटा या नाटकांमध्ये गार्गी फुले यांनी काम केलं आहे. तर राजा राणी ची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, तुला पाहते रे, कट्टी बट्टी या लोकप्रिय मालिकांमध्ये गार्गी फुले यांनी काम केलं आहे. तसेच भाडीपा चिकटगुंडे, राते या वेबसीरिजमध्येही त्या झळकल्या आहेत. आता राजकारणात त्या कशा काम करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या