Ashok Saraf : मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने शनिवारी 4 जूनला दादरच्या शिवाजी मंदिरात अशोक सराफ यांच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ (Vacuum Cleaner) या नाटकाचा खास प्रयोग पार पडला. प्रयोगाच्या मध्यांतरात अशोक सराफ यांचा विशेष सन्मान केला गेला. दरम्यान निवेदिता सराफ यांनी गरजू कलाकारांना मदत करणार असल्याचे जाहीर केले.
अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त 'मी बहुरूपी' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. निवेदिता सराफ यांनी खास घोषणा केली. 'मी बहुरूपी' या पुस्तकाच्या विक्रितीन जो निधी गोळा होईल तो गरजू कलाकारांना देण्यात येईल. ज्यांना काही व्याधी जडल्या आहेत अशा कलाकारांच्या मदतीसाठी हा निधी वापरला जाणार असल्याचे निवेदिता सराफ यांनी सांगितले.
‘व्हॅक्यूम क्लीनर’ नाटकाचा रंगला विनामुल्य सन्मान प्रयोग
शनिवारी 4 जूनला दादरच्या शिवाजी मंदिरात अशोक सराफ यांच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाचा खास प्रयोग रंगला. अशोक सराफ यांच्यासोबत या नाटकात अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांचे आहे. निवेदिता सराफ, निर्मिती सावंत, चिन्मय मांडलेकर यांच्यासह या सोहळ्याला नाटकाशी संबंधित सर्व मान्यवर उपस्थित होते.
‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग सुरू आहेत. महाराष्ट्र, गोवा, इंदौर अशा विविध ठिकाणी या नाटकाचे 300 हून अधिक प्रयोग झाले आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान राखून कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या नाटकाचे दोन प्रयोग सादर केले होते. त्यातून मिळालेला तीन लाख रुपये निधी संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला होता.
संबंधित बातम्या