मुंबई : गीतकार प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष बनल्यानंतर सिनेसृष्टीला पहिला झटका बसला आहे. पंजाबी चित्रपट 'तूफान सिंह'वर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे.


बाघेल सिंह हे 'तूफान सिंह' चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर रणजीत बावा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. देशाची व्यवस्था आणि राजकारणातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी हिरो दहशतवादी कारवायांचा आधार घेतो, अशी या सिनेमाची थोडक्यात कथा आहे. चित्रपटातील हिंसक दृश्य पाहता सेन्सॉर बोर्डाने यावर बंदी घातली आहे.



सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, "सिनेमात तूफान सिंह ही व्यक्तिरेखा हिंसक आहे. तो भ्रष्ट राजकारणी आणि पोलिसांची निर्घृण हत्या करतो. दिग्दर्शकाने सिनेमात तूफान सिंहची तुलना थेट भगत सिंह यांच्याशी केली आहे. ह्या चित्रपटात अतिशय क्रूरता आणि अराजकता दाखवली आहे. अशाप्रकारच्या क्रूरतेच्या संदेशाचं समर्थन होऊ शकत नाही."

विशेष म्हणजे 'तूफान सिंह' भारताबाहेर 4 ऑगस्ट रोजीच प्रदर्शित झाला आहे. मात्र भारतात चित्रपटाचं भवितव्य अधांतरी आहे.

पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर सिनेसृष्टीने सुटकेचा निश्वास सोडला होता. आता चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यात फार अडचणी येणार नाहीत, असा विचार सगळ्यांनीच केला होता. परंतु 'तूफान सिंह'वर बंदी घालण्याचा प्रसून जोशी यांचा हा निर्णय चित्रपटाच्या दिग्दर्शकांसाठी धक्का मानला जात आहे.