मुंबई : पायांची सूज आणि दुखण्याच्या तक्रारीनंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आता माझी तब्येत आधीपेक्षा चांगली आहे, अशी माहिती खुद्द दिलीप कुमार यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.


या सोबतच दिलीप कुमार यांनी चाहत्यांचे आभार मानत म्हटलं आहे की, "आरोग्यम् धनसंपदा असं कोणीतरी म्हटलं आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही कायम माझ्यासाठी प्रार्थना केली.

https://twitter.com/TheDilipKumar/status/806363368047210496

फिजिशीयन डॉ. एस गोखले, डॉ. नितीन गोखले आणि डॉ. आर शर्मा यांचा सहभाग असलेली डॉक्टरांची टीम माझ्यावर उपचार करत आहे.

https://twitter.com/TheDilipKumar/status/806364523779256326

नियमित वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात न्यायचंच होत. मात्र त्याअगोदरच पायांची सूज आणि दुखण्याच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल केलं. मात्र वाढदिवसाआधी आपण त्यांना घरी नेऊ, असं दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांनी सांगितलं.

11 डिसेंबर रोजी दिलीप कुमार 94 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. आधीही एप्रिल महिन्यात त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं.

सुमारे सहा दशकं काम केल्यानंतर 1998 मध्ये दिलीप कुमार यांनी सिनेमाला अलविदा केलं. 'किला' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.