मुंबई : "जुळून येती रेशीमगाठी", "नकटीच्या लग्नाला यायचं हं", यासारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'डोक्याला शॉट' हा सिनेमा नुकताच येऊन गेला. मात्र आता प्रत्यक्षात तिच्या 'डोक्याला शॉट' लागायची वेळ आली आहे. स्वत:च्याच फॅशन डिझायनरला केलेली मारहाण तिला भोवण्याची चिन्हं आहेत. कारण केवळ पोलिसात तक्रार देऊन न थांबता आता तक्रारदार जान्हवी मनचंदाने प्राजक्ता माळीविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याचं ठरवलं आहे.

प्राजक्तानेच आपल्याला काम मिळवून दिलं होतं, म्हणून आतापर्यंत तिचा स्वभाव सहन केला. मात्र यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली असं जान्हवीचं म्हणणं आहे. मूळातच काहीसा रागीट स्वभाव असलेल्या प्राजक्ताने याआधीही इतरांसोबत असे वाद घातल्याचा जान्हवीचा दावा आहे.
5 एप्रिल रोजी मिरारोड इथल्या मोनार्क स्टुडिओमध्ये एका मराठी हास्य रिअॅलिटी शोच्या दरम्यान हा संपूर्ण प्रसंग घडला. प्राजक्ताचा एक ड्रेस दिग्दर्शकाने रिजेक्ट केल्याने वाद सुरु झाला. दुसरा ड्रेस घालण्यास राजी नसलेल्या प्राजक्ताने, स्वत: कात्री घेऊन डिझायनर ड्रेसमध्ये छेडछाड केल्याने दोघींमध्ये वाद झाला आणि अखेरीस प्राजक्ताने सगळा राग आपल्यावर काढला, असा आरोप जान्हवी मनचंदाचा आरोप आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून प्राजक्ताने आपल्याला मारहाण केली, असा आरोप करत जान्हवीने तिच्याविरोधात काशीमिरा पोलिस स्थानकात रितसर तक्रार नोंदवली आहे. फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदाच्या तक्रारीनुसार, काशिमीरा पोलिसांनी प्राजक्ताविरोधात कलम 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

VIDEO | प्राजक्ता माळी अडचणीत, डिझायनरला केलेली मारहाण भोवण्याची चिन्हं | मुंबई | एबीपी माझा



जान्हवीला मारहाण केली नाही : प्राजक्ता माळी
दुसरीकडे प्राजक्ता माळीने मात्र तिच्यावरील आरोप फेटाळले आहेत. "जान्हवी मनचंदा माझी फॅशन डिझायनर होती. कपड्यांवरुन माझा आणि तिचा कपड्यांवरुन वाद झाला हे खरं आहे. पण जान्हवीला मारहाण केली नाही. जान्हवीने स्वत:च स्वत:ला इजा करुन आपल्याविरोधात खोटे आरोप केले," असं प्राजक्ता माळीने सांगितलं.

मात्र मूळात लॉची विद्यार्थिनी असलेल्या जान्हवीने इतक्यावरच न थांबता आता ठाणे सत्र न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्याचं ठरवलं आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला म्हणजे प्रकरण संपत नाही. तक्रारदाराने ठरवल्यास त्यापुढेही कायदेशीर लढाई लढता येते. त्यामुळे येत्या काळात या एकंदरीत प्रकरणामुळे प्राजक्ता माळीच्या 'डोक्याला शॉट' लागला नाही तरच नवल.

VIDEO | पुणे | सोशल मीडियावर हाय-हॅलो करणाऱ्या चाहत्यांना प्राजक्ता माळीचा नवा टास्क