लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उर्मिला मातोंडकर विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच महाआघाडीतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही मातोंडकर यांनी भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी दोघांची भेट झाली. पवार आणि उर्मिला मातोंडकर यांच्यामध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. राजकीय परिस्थितीबद्दल दोघांनी चर्चा केल्याची माहिती आहे.
उर्मिला मातोंडकर यांच्यासमोर भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं तगडं आव्हान आहे. 2014 साली गोपाळ शेट्टींनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा साडेचार लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे राजकरणात नवख्या असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करुन मार्गदर्शन घेतल्याचं सांगितलं जात आहे.
VIDEO | प्रचारादरम्यान उर्मिला मातोंडकरने विद्यार्थ्यांसाठी गायलं गाणं | मुंबई | एबीपी माझा
48 वर्षीय उर्मिलाने सोमवारी वांद्र्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना उर्मिला मातोंडकरचे पती मोहसीन मीरही तिच्यासोबत बाईकवरुन आले होते.
उर्मिला मातोंडकर यांची मालमत्ता किती?
उर्मिला मातोंडकरची जंगम मालमत्ता 41 कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये शेअर्स, बाँड, म्युचुअल फंड (28.28 कोटी) यांचा समावेश आहे. याशिवाय उर्मिलाकडे एक मर्सिडीज कारही आहे.
उर्मिलाच्या स्थावर मालमत्तेमध्ये वांद्रे परिसराती चार फ्लॅट्सचा समावेश होतो. सध्याच्या बाजारभावानुसार या फ्लॅट्सची किंमत 27.34 कोटी रुपये होते.
ठाणे जिल्ह्यातील वसईमध्ये उर्मिला मातोंडकरच्या नावे दहा एकर जमीन आहे. याची किंमत सद्यकालीन दरानुसार एक कोटी 68 लाख रुपयांच्या आसपास आहे.