मुंबई : 'लक्ष्य'सारख्या प्रेरणादायी युद्धपटानंतर फरहान अख्तर (Farhan Akhtar) आता आणखी एका असामान्य शौर्यगाथेसह प्रेक्षकांसमोर येत आहे. मेजर शैतान सिंह भाटी यांची सत्यघटनेवर आधारित वीरता ही त्याच्या आगामी चित्रपट '120 बहादुर' मध्ये (120 Bahadur) दिसणार आहे. मेजर शैतान सिंह भाटी हे भारताचे परम वीर चक्र विजेते असून ते 1962 च्या भारत-चीन युद्धातील सर्वात निर्णायक आणि ऐतिहासिक लढाई 'रेजांग ला'चे वीर नायक होते.

सन 1924 साली राजस्थानात जन्मलेले मेजर शैतान सिंह भारतीय सेनेच्या 13 कुमाऊँ रेजिमेंटच्या चार्ली कंपनीचे कमांडिंग ऑफिसर होते. 18 नोव्हेंबर 1962 रोजी लडाखच्या बर्फाच्छादित रेजांग ला भागात, त्यांनी आपल्या 119 सैनिकांसह चिनी सैन्याच्या जबरदस्त हल्ल्याला तोंड दिलं. त्यांच्या असाधारण धैर्यामुळे चुशूल एअरस्ट्रिप वाचवणं शक्य झालं आणि भारतीय सैन्याच्या इतिहासात त्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं.

अत्यंत धाडसी नेतृत्व, त्याग आणि राष्ट्रसेवेसाठी मेजर शैतान सिंह यांना मरणोत्तर परम वीर चक्र सन्मानाने गौरविण्यात आलं. हा भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार आहे.

'120 बहादुर' चित्रपट एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हैप्पी स्टुडिओज यांच्या बॅनरखाली रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि अमित चंद्रा यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीश 'रेज़ी' घई यांनी केलं आहे. कथा आणि पटकथा राजीव जी. मेनन यांची असून संवाद सुमित अरोरा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचं संगीत अमित त्रिवेदी यांनी दिलं आहे, तर गीते जावेद अख्तर यांच्या लेखणीतून उतरलेली आहेत.

'120 बहादुर' चित्रपटगृहात 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार असून, आजच्या पिढीला एक सच्ची, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद युद्धगाथा अनुभवता येणार आहे.

'1962 च्या युद्धातील एका अजरामर लढाईचं रूपांतर सिनेमात करणं ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मेजर शैतान सिंह यांचं जीवन आणि बलिदान भारतीय इतिहासाचा तेजस्वी अध्याय आहे'. असं फरहान अख्तरने म्हटलं आहे. 

                    

ही बातमी वाचा: