पिंपरी-चिंचवड : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आदर्श शिंदे यांच्या नावे फेक फेसबुक प्रोफाईल तयार करुन अनेकांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बीडच्या अंबेजोगाईचा मूळ रहिवासी असलेल्या संतोष उजागरे विरोधात पिंपरीतील निगडीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.


संतोषनं आदर्श शिदेंच्या नावे दोन वर्षांपूर्वी बनावट फेसबुक अकाऊंट उघडल्याचं समोर आलं आहे. या माध्यमातून आतापर्यंत अनेकांकडून पैसे उकळल्याची माहिती आहे. फिल्म इंडस्ट्रीत काम देण्याच्या आमिषाने त्यानं अनेकांकडून पैसे लाटल्याचा संशय आहे.

एका महिलेकडून संतोषनं हजारो रुपये घेतले होते. त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, या महिलेनं थेट आदर्श शिंदेंचे भाऊ उत्कर्ष शिंदेंशी संपर्क साधला. तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला.  या प्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

आदर्श शिंदे यांनी गायलेली 'देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही', मोरया, गाणं वाजू द्या, गजाल खरी काय, अंबे कृपा करी यासारखी गाणी प्रचंड गाजली आहेत.