पुणे : प्रख्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी रात्री-अपरात्री होणाऱ्या डिस्कोच्या ठणाण्याविरोधात सोशल मीडियावर संतापाचा सूर आळवला आहे. माझा धर्म कलाकाराचा आहे, त्यामुळे हिंदू असो वा मुस्लिम, सणांच्या वेळी डीजेच्या दणदणाटाला परवानगी देणारे पोलिस शास्त्रीय संगीताच्या मैफिलीलाच कसे आडवे येतात, असा सवाल त्यांनी विचारला आहे.


'रात्रीचे 11.15 वाजले आहेत. जोरजोरात डिस्को म्युझिकचा ठणाणा आवाज येतोय. (पुण्यातील) प्रभात पोलिस चौकीला दोनदा फोन केला, कोणीही उचलला नाही. 100 क्रमांकावर चार वेळा फोन केला, तर बिझी. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम रात्री दहाच्या पुढे गेला की लगेच पोलिस कसे हजर होतात?' असा सवाल राहुल देशपांडेंनी फेसबुकवर विचारला आहे.

'शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या वेळी पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय आठवतो, मग आता कुठे गेला आदेश?' असा प्रश्न विचारत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग करुन जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

'आज ईदची मिरवणूक आहे म्हणून उशिरापर्यंत धांगडधिंगा सहन करायचा. गणपतीमध्येही तेच. माझा धर्म कलाकाराचा आहे. सूर हे आमचे दैवत आहे. आमच्या देवाची पूजा करताना मात्र सरकार आम्हाला आडवं येत आहे. हे सगळं चालतं मग आमच्या पूजेच्या आड का येता. कारण आम्ही सॉफ्ट टार्गेट आहोत?' असा जळजळीत प्रश्न राहुल देशपांडेंनी उपस्थित केला आहे.

राहुल देशपांडेंच्या फेसबुक पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. पोस्टला 950 हून जास्त लाईक्स, तर 65 हून जास्त शेअर मिळाले आहेत.


संबंधित बातम्या :


आपण नाही सुधारणार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबाबत सुबोधची खंत


सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील व्यवस्थेवर सुमीत राघवनची पोस्ट