आतापर्यंत 15 कोटींचा आयकर भरुनही वर्सोव्यातल्या ऑफिसच्या बांधकामासाठी 5 लाखांची लाच द्यावी लागल्याचा ट्वीट करुन कपिल शर्माने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच, हेच का अच्छे दिन? असा सवाल केला होता. पण त्यानंतर कपिलचेच ऑफिस अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे.
आता हेच अनधिकृत ऑफिस पाडावं लागलं, तर त्यासाठी लागणारा खर्च कपिलकडून वसूल केला जाणार आहे. किती पैसे वसूल केले जातील, त्याबद्दलची नोटीस कपिल शर्माला गणपतीनंतर पाठवली जाईल.
काय आहे प्रकरण ?
कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ट्वीट करुन महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या मंजुरीसाठी 5 लाख मागितल्याचा आरोप केला. इतकंच नाही तर आपण आतापर्यंत 15 कोटींचा टॅक्स भरल्याची आठवणही त्याने करुन दिली. शिवाय ‘हेच का अच्छे दिन?’ असा खोचक सवालही विचारला.
ज्या बांधकामासाठी लाच मागितली गेली, ते वर्सोव्यातील ऑफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनी केला आहे. वर्सोव्याच्या ज्या भागात हे ऑफिस थाटलं जातंय, तो भाग, रहिवाशी बांधकामासाठी राखीव आहे. पण त्याच भागात व्यावसायिक बांधकाम सुरु असल्याचा आरोप आहे. कपिलनं वर्सोव्यात एका मजल्याऐवजी अनधिकृतपणे तीन मजले उभारले आहेत. त्यासाठी खारफुटीचं जंगलही तोडल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने तसंच मनसेनेही केला आहे.
कपिलच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांसह महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपनंही लाचखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लाचखोर अधिकाऱ्याचं नाव कपिल शर्मानं उघड करावं असं आवाहन मुंबई पालिकेनं केलंय. याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे.
कपिल शर्माचं मुंबईतील शुटिंग बंद पाडू अशा इशारा मनसेनं दिल्यानंतर कपिल शर्माने सावध पवित्रा घेतला होता. आणखी एक ट्वीट करत 'मी फक्त भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. भाजप, शिवसेना किंवा मनसेवर कुठलाही आरोप केला नाही' असा दावा कपिल शर्माने ट्वीटद्वारे केला.