मुंबई : सोनू सूद सध्या मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईमुळे चर्चेत आहे. मुंबईतील जुहू परिसरात असणाऱ्या 'शक्ति सागर' नावाच्या रहिवाशी इमारतीमध्ये अवैध्यरित्या बांधकाम करत तिथे हॉटेल सुरु केलाचा आरोप मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदवर लावला आहे. अशातच हे प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. परंतु, बीएमसीने अनेक आरोप केल्यानंतरही सोनूने याप्रकरणी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आज सोनूने आपलं मौन सोडत एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया दिली.


मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईसंदर्भात बोलताना सोनू सूद म्हणाला की, "मी मुंबई महानगरपालिकेचा आदर करतो. ज्यांनी आमच्या मुंबईला एवढं सुंदर बनवलं आहे. माझ्या बाजूने मी सर्व नियमांचं पालन केलं आहे. अशातच यामध्ये जर काही चुकलं असेल किंवा सुधारणा करण्याची गरज असेल तर ते करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करिन. उच्च न्यायालयात आम्ही याप्रकरणासंदर्भात याचिका दाखल केली आहे. जसं ते मला गाइड करतील ते मी सर्व फॉलो करिन. न्यायालयाच्या वतीने जे आदेश दिले जातील, त्यांचं पूर्णपणे पालन करून, न्यायालयाने सांगितलेल्या सर्व बाबी पूर्ण करिन. तसेच मी सर्व कायद्यांचं आणि नियमांचं पालन करिन."


मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार, सोनू सूदने कथितरित्या मुंबई महापालिकेच्या नियमांचं अनेकदा उल्लंघन केलं आहे. तसेच अनेकदा अवैध्य बांधकाम उध्वस्थ केल्यानंतरही त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. जेव्हा एबीपी न्यूजने सोनू सूदला बीएमसीने लावलेल्या या आरोपांबाबत विचारलं तेव्हा सोनू म्हणाला की, "जसं मी सांगितलं की, हे प्रकरण सध्या न्यायालयात असून याप्रकरणी न्यायालय जे आदेश देईल त्यांचं मी पालन करीन. न्यायालयाहून श्रेष्ठ कोणीच नाही. मी नेहमीच कायद्याचा सन्मान करोत आणि करत राहिन."


पाहा व्हिडीओ : मुंबई मनपा आरोप अन् शरद पवार भेटीवर सोनू सूद म्हणतो...



मुंबई महानगरपालिकेसोबत सुरु असलेल्या या वादा दरम्यान सोनू सूदने एनसीपीचे दिग्गज नेते शरद पवार यांचीही भेट घेतली होती. या भेटीचा उद्देश बीएमसीसोबत सुरु असलेल्या वादासंदर्भात होता का? एबीपी न्यूजच्या या प्रश्नावर उत्तर देताना सोनू म्हणाला की, "शरद पवार यांच्यासोबत झालेली भेट सामान्य होती. शरद पवार यांच्या भेट घेण्याचा विचार गेल्या बऱ्याच दिवसांपासून होता. मी त्याची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. ते कमालीचं काम करतात. त्यांनीही माझ्या कामाचं खूपच कौतुक केलं. आम्हा दोघांमध्ये एक सामान्य भेट झाली. बीएमसीसोबतच्या विवादांबाबत या भेटीदरम्यान काहीही बोलणं झालं नाही."


उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, सोनू सूद आज सकाळी मुंबई कांदवलीच्या ठाकूर स्टेडिअममध्ये अंडर-19 क्रिकेट पाहण्यासाठी पोहोचले होते. जिथे सोनूने मुलांसोबत वेळ घालवला. तसेच सोनू सूद क्रिकेट खेळतानाही दिसला. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी या प्रकरणाच्या सुनावणीनंतर आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे.