सैराटमधील झिंगाट, सैराट झालं जी आणि याड लागलं या गाण्यांनी चाहत्यांच्या मनावर अक्षरश: अधिराज्य गाजवलं आहे. अजय-अतुल यांचा आवाज आणि संगीताच्या तडक्यामुळे ही गाणी आता सगळीकडेच गुणगुणली जात असल्याचं दिसून येतंय.
VIDEO: अजय-अतुलही झाले सैराट, झिंगाटवर तुफानी डान्स!
नागराज मंजुळेने या सिनेमासाठीही मेहनत घेतली आहे. या सिनेमातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आणि परशा म्हणजे आकाश ठोसर यांना शोधण्यापासून, त्यांच्याकडून काम करवून घेण्यापर्यंत नागराजने सर्वकाही एकहाती केलं आहे.
नववीत शिकणारी रिंकू
रिंकूला डान्सची आवड होती. अभिनयाबाबत तिला काहीही गंध नव्हता. मात्र एकदा रिंकू नागराज मंजुळेला भेटली आणि त्याला तिच्यात 'सैराट'साठी हवी असणारी आर्ची दिसली. ज्यावेळी रिंकू आणि नागराजची भेट झाली, त्यावेळी ती सातवीत शिकत होती. प्रत्यक्ष सिनेमा शुटिंग सुरू होण्यापूर्वी रिंकूच्या अनेक ऑडिशन्स झाल्या. तब्बल र्षानंतर तिला 'सैराट'मधील प्रमुख भूमिकेसाठी निवडण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
मजेमजेत ऑडिशन, वर्षभर सस्पेन्स
रिंकू ही काही कसलेली अभिनेत्री नव्हती. 'सैराट' च्या ऑडिशनसाठी नागराज मंजुळे ऑडिशनसाठी आला होता. त्यावेळी रिंकूने मजे-मजेत ऑडिशन दिलं. यावेळी नागराजने तुला आणखी काय येतं, हे विचारलं. त्यावर रिंकू म्हणाली, मला डान्स येतो. मग नागराजने तिचा डान्स पाहिला. यानंतर तिला पुण्याला ऑडिशनसाठी बोलावलं. मग वर्षभरानंतर रिंकूला निवड झाल्याचं सांगण्यात आलं.
परशाचा अनुभव
या सिनेमात आकाश ठोसरने परशाची भूमिका साकारली आहे. नागराजने जशी आर्ची शोधली, तसाच परशाही शोधला. नागराजदादाने मला ऑडिशन द्यायला सांगितलं. त्यावेळी माझ्या मनात तसं काही नव्हतं, एखादा छोटा, साईड रोल देतील असं वाटलं होतं, असं आकाशने सांगितलं.
13 किलो वजन घटवलं
आकाश ठोसर हा कुस्ती खेळतो. त्यामुळे शरिराने हट्टा-कट्टा. पण 'सैराट'मधील भूमिकेसाठी नागराजला इतका हट्टा-कट्टा हिरो नको होता. त्यामुळे त्याने पहिल्यांदा आकाशला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. यानुसार आकाशने पहिल्या 7 दिवसात साडेचार किलो , मग 28 दिवसात एकूण 13 किलो वजन घटवलं.
रिंकूचा बुलेट चालवण्याचा अनुभव
या सिनेमात आर्ची अर्थात रिंकूने बुलेट चालवण्याचा सीन आहे. मात्र यासाठी तिला खास प्रयत्न करावे लागले नाहीत. मी डिस्कव्हर ही गाडी एका दिवसात शिकले, मात्र बुलेटचे गिअर वेगळे असल्यामुळे थोडं अडखळले, पण तीही एकाच दिवसात शिकल्याचं रिंकूने सांगितलं.
कॅमेरा, एक्स्प्रेशन आणि बुलेट चालवणं ही कसरत करायची होती, त्यामुळे टेन्शन होतं, पण सरावाने ते सगळं सोपं झाल्याचंही रिंकून यावेळी नमूद केलं.