Prakash Raj: अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांना प्रणव ज्वेलर्स मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) समन्स बजावले आहे. पॉन्झी स्कीम (Ponzi Scheme) घोटाळ्याप्रकरणी ईडीने तामिळनाडूतील त्रिची येथील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्सवर छापा टाकला होता. प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्सची जाहिरात करतात. छापेमारीनंतर तपास यंत्रणेने आता प्रकाश राज यांना नोटीस पाठवली आहे.


नेमकं प्रकरण काय?


तामिळनाडूच्या त्रिची येथील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्समध्ये PMLA अंतर्गत शोध मोहिमेदरम्यान अशी अनेक कागदपत्रे सापडली ज्यामध्ये सुमारे 23 लाख 70 हजार रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती आढळली. एवढेच नाही तर ईडीने झडतीदरम्यान 11 किलो 60 ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त केले.


प्रणव ज्वेलर्सच्या लोकांनी अनेक शेल कंपन्यांच्या माध्यमातून सोने योजनेतून जनतेकडून गोळा केलेले 100 कोटी रुपये गुंतवल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले. ईडीच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान असे आढळून आले की प्रणव ज्वेलर्स आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी फसवणूक करून घेतलेले पैसे दुसऱ्या शेल कंपनीकडे वळवले होते. प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्सची जाहिरात करतात, त्यामुळे आता या प्रकरणी प्रकाश राज यांची देखील चौकशी केली जाणार आहे.






बुधवारी जारी केलेल्या निवेदनात, ईडीने म्हटले  की, "तपासात असे दिसून आले आहे की प्रणव ज्वेलर्स आणि इतर संबंधित व्यक्तींनी सराफा/सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावाखाली सार्वजनिक निधी बनावट संस्था/अॅक्सेस प्रदात्यांकडे हस्तांतरित करून जनतेची फसवणूक केली आहे." त्रिचीस्थित प्रणव ज्वेलर्सने उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन सोने गुंतवणूक योजनेच्या नावाखाली जनतेकडून 100 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


प्रकाश राज हे अनेकवेळा त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. प्रकाश यांनी बॉलिवूडसोबतच साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांनी केजीएफ, वॉन्टेड,वारिसू यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. सिंघम या चित्रपटामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांनी  जयकांत शिक्रे ही भूमिका साकारली होती. प्रकाश राज हे पुष्पा-2 या आगामी चित्रपटामध्ये देखील काम करणार आहेत, असंही म्हटलं जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Prakash Raj: 'चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा'; स्वामी चक्रपाणी यांच्या मागणीवर अभिनेते प्रकाश राज यांची प्रतिक्रिया; म्हणाले....