Bollywood Remakes : बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेले काही चित्रपट हे प्रादेशिक अथवा इतर भाषेतील चित्रपटांचे रिमेक (Bollywood Remakes) असल्याचे समोर आले होते. आता, बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये रिमेक होणार आहे. मूळ मल्याळम भाषेतील असणाऱ्या 'दृश्यम' (Drishyam) या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये छाप सोडली. मोहनलाल यांनी साकारलेली भूमिका हिंदी चित्रपटात अजय देवगणने साकारली होती.
ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, 'पॅनोरमा स्टुडिओ 'दृश्यम' फ्रँचायझी हॉलिवूडमध्ये नेण्यासाठी तयार आहे. भारत आणि चीनमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर निर्माता कुमार मंगत पाठक आणि पॅनोरमा स्टुडिओने 'दृश्यम' हॉलिवूडमध्ये बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी गल्फस्ट्रीम पिक्चर्स आणि जोट फिल्म्सशी हातमिळवणी केली आहे.
या चित्रपटाचा होणार कोरियन व्हर्जन
रमेश बाला यांनी सांगितले की पॅनोरमा स्टुडिओने मूळ निर्माता असलेल्या आशीर्वाद सिनेमाकडून मल्याळम चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय रिमेक हक्क विकत घेतले आहेत. हॉलिवूडबरोबरच 'दृश्यम' फ्रँचायझीच्या कोरियन व्हर्जनवरही काम सुरू आहे. मल्याळम चित्रपट 'दृश्यम' चे रिमेक हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ, सिंहली आणि चीनी अशा विविध भाषांमध्ये रिमेक झाले आहेत.
'दृश्यम'चा पहिला भाग सुपरहिट गेल्यानंतर त्याचा सिक्वेल असणारा 'दृश्यम 2' देखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला होता. 'दृश्यम'च्या (Drishyam) पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामतने केलं आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बू (Tabu) मुख्य भूमिकेत होते. 'दृश्यम 3' च्या कथानकाची जुळवाजुळव सुरू असल्याचे वृत्त होते. या सिक्वेलमध्ये मोहनलाल आणि अजय देवगण एकत्र झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.