गर्ल्स सिनेमाचं दुसरं पोस्टर आलं आणि चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टरवर 'आयुष्यावर बोलू काही' असं लिहिलेला टी-शर्ट घातलेली एक तरूणी असभ्य हावभाव करते आहे. यावरून डॉ. सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


मराठी सिनेविश्वात खूप नवनवे विषय हाताळले जाता आहेत. मराठी प्रेक्षकांनीही या विषयांचं स्वागत केलं आहे. केवळ कौटुंबिक नव्हे, तर कॉलेजवयीन मुलांना आकर्षित करण्यासाठीही बॉईज, टकाटक सारखे सिनेमे येऊ लागले आहेत. बॉइजला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आता त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'गर्ल्स' हा सिनेमा बनवला आहे. यात तीन मुलींची गोष्ट असल्याचं या सिनेमाच्या पोस्टरवरून वाटतं. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पहिलं पोस्टर आलं. मात्र आज दुसरं पोस्टर आल्यावर मात्र जरा कल्लोळ उडाला आहे.

या नव्या पोस्टरमध्ये सिनेमातली एक अभिनेत्री दिसते. त्यात तिने 'आयुष्यावर बोलू काही' असं लिहिलेला टी शर्ट घातला आहे. तर #FamilySucks असंही यावर लिहीलं आहे. हा टी-शर्ट घालून तिने हावभाव केले आहेत. हे पोस्टर सकाळी आलं आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रियांना सुरूवात झाली. आयुष्यावर बोलू काही टी-शर्ट घालून या मुलीने केलेल्या हावभावाचा पहिला निषेध नोंंदवला आहे तो डॉ. सलील कुलकर्णी यांनी. महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना संदीप खरे आणि सलील यांनी आपल्या या कवितांच्या कार्यक्रमाने वेड लावलं आहे. आजही याचे कार्यक्रम देशा-परदेशात होताना दिसतात. सलील यांनी मात्र या पोस्टरचा निषेध केला आहे. फेसबुकवर यासंबंधीची पोस्ट त्यांनी शेअर केली असून त्यात या पोस्टरचा निषेध करण्यात आला आहे. 'आई वडील भाऊ बहीण अशा नात्यांना समोर ठेवून आम्ही एक अत्यंत हळवा कार्यक्रम केला. जवळपास 16 वर्षं आम्ही हा कार्यक्रम करतोय. पण त्याचा हा असा अपमान नींदनीय आहे. मी, संदीप आणि या कार्यक्रमाची सर्व टीम याचा निषेध करतो,' अशा आशयाची पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे.



या पोस्टचं अनेकांनी समर्थन केलं आहे. त्याचवेळी गर्ल्स सिनेमाच्या टीमचं यावरचं म्हणणं काय ते मात्र अद्याप कळलेलं नाही.