मुंबई : अनुराग कश्यप यांच्या 'उडता पंजाब'वरुन मोठं वादळ उठलं. सिनेमा रिलीज होण्याआधीच इंटरनेटवर लीकही झाला. त्यावरुनच अनुरागने त्याच्या फेसबुक पेजवरुन सिनेरसिकांना अत्यंत भावनिक आवाहन केलं आहे. पायरसी, टोरेंट डाऊनलोड आणि सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहणं, या तिन्ही मुद्द्यांना अत्यंत भावनिकरित्या हात घालत अनुरागने चाहत्यांना आवाहन केलं आहे.

 

अनुराग म्हणतो, मी आजपर्यंत टोरेंटवरुन कोणताही सिनेमा डाऊनलोड करुन पाहिला नाही. किंबहुना मला माहितही नाही की, टोरेंटवरुन कसा सिनेमा डाऊनलोड केला जातो. कधी-कधी मित्रांनी डाऊनलोड केलेले सिनेमे पाहिले आहेत. मात्र, त्या सिनेमांची डीव्हीडी खरेदी करुन किंवा इतर पद्धतीने पैसे चुकवण्याचाही प्रयत्न करायचो. मात्र, हे सारं सांगत असताना, मला हेही माहित आहे की, डाऊनलोड करण्यचा तुमचा अधिकार कोणीही रोखू शकत नाही.

मात्र, यावेळी माझा लढा थोडा वेगळा आहे. माझा लढा सेन्सॉरशिपविरोधात आहे. जर तुम्ही सिनेमे डाऊनलोड करुन पाहात असाल, तर नेहमीप्रमाणे शनिवारीच हा सिनेमा डाऊनलोड करुन पाहा. माझ्या मते, पायरसी होते कारण लोकांकडे कमतरता आहे. फ्री इंटरनेटच्या जगात सिनेमा डाऊनलोड करुन पाहणं, यात काही गैर नाही. मात्र, उडता पंजाबच्या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करतो की, या सिनेमाबद्दलचं कुतूहल आणि उत्सुकता दोन दिवसांसाठी कायम ठेवा. आणि तरीही तुम्हाला सिनेमा डाऊनलोड करुनच पाहायचा असेल, तर शनिवारी करा. तोपर्यंत तुम्हीच ठरवा या सिनेमाला पैसे मोजायचे की नाही?”

 

अनुरागने अत्यंत समर्पक शब्दात पायरसी आणि टोरेंटवरुन सिनेमा डाऊनलोड करणाऱ्यांना आवाहन केलं आहे.  विशेष म्हणजे अनुरागच्या या पोस्टखाली फेसबुक यूझर्सनीही सहमती दर्शवत अनुरागला पाठिंबा दर्शवला आहे.