मुंबई : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या तब्येतीविषयी चर्चा सुरु असतानाच आता डिस्को डान्सर मिथुनदा अर्थात मिथुन चक्रवर्ती यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मिथुन चक्रवर्ती यांना अमेरिकेतील लॉस एंजलिसच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी अमेरिकेत जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार ते अमेरिकेतील रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या मुलगा महाअक्षय चक्रवर्ती आणि सून मदालासा शर्माही अमेरिकेत आहेत.


2018 मध्ये मिथुन चक्रवर्ती एका रियालिटी शोमध्ये जज होते. 66 वर्षांचे अभिनेता कंबरदुखीमुळे त्रासलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या आजाराने ते त्रस्त आहेत.  गेल्या काही महिन्यांपासून या कंबर दुखीचा त्रास वाढला आहे.

2009 मध्ये लकी चित्रपटातील एक सीन करताना मिथुन चक्रवर्तींना दुखापत झाली. तेव्हापासून त्यांना पाठदुखीचा त्रास जडला आहे. याच पाठदुखीवर उपचार करण्यासाठी ते अमेरिकेतील रुग्णालयात दाखल झाले आहेत. 2009 मध्ये दुखापत झाल्यावर त्यांनी उपचार केले. मात्र 2016 मध्ये त्यांना पाठदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी एक मोठा ब्रेक घेऊन या पाठदुखीवर उपचार केले. पाठदुखीचा त्रास त्यांना जास्त होऊ लागल्याने त्यांनी काम करणेही सोडले आहे.

मिथुन यांनी 1976 मध्ये आलेल्या मृगया या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 1982 मध्ये आलेला डिस्को डान्सर हा सर्वात हिट सिनेमा ठरला. काही काळ राजकीय जीवनात देखील त्यांनी छाप सोडली आहे.