Marathi Movie Yere Yere Paisa 3 : दिग्दर्शक संजय जाधव यांच्या आगामी  "ये रे ये रे पैसा 3" या चित्रपटात आणखी काही नव्या कलाकारांची वर्णी लागली आहे.  "ये रे ये रे पैसा 3" या चित्रपटाचा मुहूर्त आज सकाळी मुंबईत पार पडला. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आदींच्याही  भूमिका आहे.


'ये रे ये रे पैसा' आणि 'ये रे ये रे पैसा 2' या चित्रपटांनी यापूर्वी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं होतं. पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या कथासूत्रावर हे चित्रपट बेतलेले होते. आता आधीच्या दोन चित्रपटांतलं कथानक आणि त्या धमाल व्यक्तिरेखा आता तिसऱ्या भागात काय धमाल करणार याची उत्सुकता चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच निर्माण झाली आहे. 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्रीची वर्णी


"ये रे ये रे पैसा 3" मध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तील अभिनेत्री वनिता खरातचीदेखील वर्णी लागली आहे. छोट्या पडद्यावर आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी वनिता आता   "ये रे ये रे पैसा 3" धमाल करण्यास सज्ज झाली आहे.  


 "ये रे ये रे पैसा ३" या मल्टिस्टारर चित्रपटात आता अभिनेत्री वनिता खरातसह नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची भर पडली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते-दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक, दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून देईल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे. 


अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो  या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर,  ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन हे सहनिर्माते आहेत . चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे. तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. 


चित्रपटात कोणते कलाकार?


"ये रे ये रे पैसा 3" मध्ये चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात असणार आहे.