मुंबई : 'फँड्री' आणि 'सैराट' या सिनेमांच्या जबरदस्त यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे नव्या चित्रपटाच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे हा आगामी सिनेमा नागराज मंजुळे झी स्टुडिओसोबत करणार आहे.

झी स्टुडिओ मराठीच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबची माहिती देण्यात आली. 22 सेकंदांच्या या व्हिडीओमधून नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ यांच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली. पण सिनेमाचं नावं मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. फँड्री आणि सैराट सारखंच नव्या सिनेमाचं नाव हटके असणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच असेल.


स्वत: नागराज मंजुळेनेही नव्या प्रोजेक्टचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. फँड्री आणि सैराटमधून सामाजिक विषय हाताळणाऱ्या नागराज मंजुळेचा नवा सिनेमा कोणता असेल, त्याचं नाव काय असेल यासाठी चाहत्यांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.