Kedar Shinde Post : ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) या चित्रपटामुळे निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. या चित्रपटातून केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे (Sana Shinde) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सना तिच्या पणजीची म्हणजेच शाहीर साबळे यांच्या पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामुळे नवखा चेहरा असली तरी सना शिंदे देखील चर्चेत आली आहे. आज (18 ऑक्टोबर) सनाचा वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वडील केदार शिंदे यांनी खास मोलाचा सल्ला देणारी पोस्ट शेअर केली आहे.


‘सना.. कलाकाराचं आयुष्य हे ECG सारखं असतं. वर खाली आलेख आपल्याला अस्वस्थ करतो. कधी आनंद तर कधी दु:ख देतो... मायबाप प्रेक्षकांच्या पायावर डोकं ठेवलं तर आपले पाय आपसूकच जमिनीवर रहातात एवढं ध्यानात ठेव!’, असं म्हणत केदार शिंदे यांनी एक पोस्ट लिहिली आहे.


लेकीला शुभेच्छा देताना काय म्हणले केदार शिंदे?


निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लेकीला शुभेच्छा देताना एक पत्रवजा पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी लेक सना हिला बाबा म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच, पण एक अनुभवी कलाकार म्हणून एका दिग्दर्शक-निर्मात्याच्या भूमिकेत शिरून सल्ला देखील दिला. या पोस्टमध्ये ते लिहितात...


‘प्रिय सना...


तशी रोजच भेटतेस.. पण आज हे लिहिण्याचं कारण, तुझा वाढदिवस.. दरवर्षी प्रमाणे आजही तो आलाच!!! पण दरवर्षी पेक्षा यंदा त्याचं महत्व तुला जास्त वाटत असावं. कारण या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी तू कॅमेऱ्यासमोर काम करते आहेस.. हे येणारं वर्ष तुझ्यासाठी खुप आव्हानात्मक असणार आहे. कॅमेऱ्यासमोर येण्याचं तुझं तू ठरवलस.. त्याआधी गेले काही वर्ष मला सहाय्यक म्हणून मदत केलीस.. माझ्या शिव्या ओरडा हक्काने खाललास.. खुप वेळा डोळ्यात पाणी सुध्दा आलं असेल. पण तू, हू का चू केलं नाहीस. माझ्या टीममध्ये तुला राजकुमारीची ट्रिटमेंट कधीच मिळू नये याकडे माझं लक्ष होतं. कारण, त्याशिवाय मिळणाऱ्या गोष्टीची तुला किंमत कधीच कळणार नाही.. आता महाराष्ट्र शाहीर या सिनेमात तू माझ्या आजीची म्हणजे, भानुमती साबळे ही भुमिका करते आहेस. त्यासाठी तुझ्या इतकाच मी सुद्धा excited आहे. प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक कामावर भरभरून प्रेम केलं. तेच तुझ्याही वाट्याला येवो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना..


सना.. कलाकाराचं आयुष्य हे ECG सारखं असतं. वर खाली आलेख आपल्याला अस्वस्थ करतो. कधी आनंद तर कधी दु:ख देतो... मायबाप प्रेक्षकांच्या पायावर डोकं ठेवलं तर आपले पाय आपसूकच जमिनीवर रहातात एवढं ध्यानात ठेव!!!!!


तुझाच बाबा’


 



शाहीर साबळे यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा चित्रपट!


शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या जीवनकार्याचा वेध 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातून घेतला जाणार आहे. अनेक नाटकं, टीव्ही मालिका केलेल्या ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचे लेखन केले आहे. अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळेंची भूमिका साकारणार आहे. 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 18 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!