Diljit Dosanjh Gets Notice: पंजाबी गायक (Punjabi Singer) आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या आपल्या 'दिल-लुमिनाटी टूर'मध्ये धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर (Social Media) त्याच्या कॉन्सर्टचे (Concert) अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दिलजीत दोसांझसाठी चाहत्यांचं प्रेम स्पष्टपणे पाहायला मिळतंय. दिलजीतची पुढची कॉन्सर्ट आज म्हणजेच, 15 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे, या कॉन्सर्टसाठी त्याचे चाहते खूपच उत्सुक आहेत. मात्र, या कॉन्सर्टपूर्वीच तेलंगणा सरकारनं (Telangana Government) दिलजीतला नोटीस बजावली आहे.
हैदराबाद सरकारनं दिलजीतला बजावलेल्या नोटीसमध्ये त्याच्या तीन गाण्यांवर तेलंगणा सरकारनं बंदी घातली आहे. तेलंगणा सरकारनं त्यांची टीम आणि हॉटेल नोव्होटेलला ही नोटीस दिली आहे. दारू, ड्रग्ज किंवा हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी गाणी वाजवू नयेत, असा स्पष्ट उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. दिलजीतच्या दिल्लीतील शेवटच्या कॉन्सर्टमध्ये अशा गोष्टींच्या तक्रारी आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. याशिवाय लहान मुलांना मंचावर आणू नये, तसेच, आवाज खूप मोठा ठेवू नका, असंही सांगण्यात आलं आहे.
दिलजीत दोसांझच्या तीन गाण्यांवर बंदी
याशिवाय, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेलंगणाच्या जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांनी दिलजीत दोसांझला पाठवलेल्या नोटीसमध्ये, त्याच्या कॉन्सर्टमध्ये 'पटियाला पेग', 'पंज तारा' आणि 'केस' गाण्यास मनाई करण्यात आली आहे. ही नोटीस महिला आणि बालकल्याण आणि अपंग आणि ज्येष्ठ नागरिक विभागानं दिलजीतला बजावली आहे. याआधीही त्यांच्याविरोधात तक्रार आली होती, ती चंदीगड येथील रहिवासी पंडितराव धरनवार यांनी 4 नोव्हेंबरला दिली होती. शोदरम्यान दिलजीत मुलांना स्टेजवर बोलावतो, हे योग्य नाही, असं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.
जर सगळ्या अटी मान्य केल्या नाहीत, तर कारवाई होणार
यासोबतच नोटीसमध्ये मद्य, ड्रग्ज आणि गन कल्चरवर आधारीत गाण्यांवरही रोख लावण्यात आला आहे. यापूर्वी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं लाईव्ह शोमध्ये दारू, ड्रग्ज आणि बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन देणारी गाणी गायली जाऊ नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. सध्या दिलजीतच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये असं म्हटलं आहे की, जर त्यानं अशी गाणी गायली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, गायकाचा हा दौरा 26 ऑक्टोबर रोजी दिल्लीपासून सुरू झाला होता, जो जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद, लखनऊ, पुणे, कोलकाता, बंगळुरू, इंदूर, चंदीगडनंतर 29 डिसेंबर रोजी गुवाहाटी इथे संपणार आहे.