मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी बिल्डर समीर भोजवानी याला 200 कोटींची मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांच्या वांद्रास्थित 250 कोटी संपत्तीवर समीर भोजवानीने चुकीचा दावा केल्याबद्दल ही नोटीस पाठवली आहे.


दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी 18 जानेवारी 2018 रोजी समीर भोजवानीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. वांद्र्यामधील त्यांच्या बंगल्यातील काही जागेची खोटी कागदपत्रे तयार करून समीर भोजवानी ही जागा बळकाविण्यासाठी धमकावत असल्याची तक्रार सायरा बानो यांनी केली होती. त्यांतर समीर भोजवानीला पोलिसांनी एप्रिलमध्ये अटक केली होती.

समीर भोजवानी जेलमधून सुटून आल्यानंतर सायरा बानोंनी पंतप्रधान मोदी यांना ट्विट करत मदत मागितली होती. भू-माफिया समीर भोजवानी हा कारागृहातून बाहेर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतरही काही कारवाई झाली नाही, असं ट्विट सायरा बानो यांनी मोदींना अभिनेते दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन केलं होतं.

त्यानंतर समीर भोजवानीने 21 डिसेंबर 2018 ला सार्वजनिक नोटीस देत, संबंधित संपत्तीचा मालक मी असल्याचं त्यात म्हटलं होत. तसेच दिलीप कुमार हे त्या जागेचे फक्त भाडेकरु आहेत, असेही त्या नोटीसमध्ये म्हटलं होतं.

समीर भोजवानीच्या या सार्वजनिक नोटीसवर अक्षेप घेत दिलीप कुमार आणि सायरा बानोंनी नोटीस पाठवली. मानहानीकारक सार्वजनिक नोटीसने दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या प्रतिष्ठित प्रतिमेला धक्का पोहोचला आहे, असे त्यांचे वकील चिराग शाहांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे.