Digpal Lanjekar : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यांच्या 'सुभेदार' (Subhedar) या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सुभेदार चित्रपटानंतर दिग्पाल यांचा ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) या चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता दिग्पाल यांनी नुकतीच त्यांच्या आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'मुक्ताई' असं आहे. एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन दिग्पाल यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केला व्हिडीओ
दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विठूरायाची मूर्ती दिसत आहे. या व्हिडीओला दिग्पाल यांनी कॅप्शन दिलं, "नवे क्षितीज …. नवे सीमोल्लंघन… कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची चिमुकली पण आभाळ व्यापून उरणारी बहीण मुक्ताई. तिच्या दिव्यदृष्टीने पाहिलेली ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा !". 'मुक्ताई' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्पाल हे श्री संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची कथा प्रेक्षकांच्या समोर मांडणार आहेत.
दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी दिग्पाल यांच्या या आगामी चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कधी रिलीज होणार मुक्ताई चित्रपट?
मुक्ताई या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट जून 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
दिग्पाल लांजेकर यांचे चित्रपट
'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj), 'सुभेदार' (Subhedar) या दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता त्यांच्या मुक्ताई आणि ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा' हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमकूळ घातला. सुभेदार या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली.
संबंधित बातम्या: