Subhedar Movie : शिवराज अष्कातील पाचवे चित्रपुष्प अर्थात 'सुभेदार' (Subhedar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. 'सुभेदार' या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) सांभाळली आहे. 


दिग्पाल लांजेकरने शेअर केले मोशन पोस्टर


दिग्पाल लांजेकरने 'सुभेदार' या सिनेमाचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"रक्तामंदी उसळं तापता लाव्हा शिवराया शब्दाची आन आम्हाला वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू जिंकून नाचवू ध्वज भगवा आले मराठे आले मराठे... आदी न अंत अशा शिवाचे मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून पाच्छाई झोडती असे मराठे सुभेदार गड आला पण...".






मराठा स्वराज्याचा ज्वलंत आणि स्फूर्तीदायी इतिहास कायमच आपल्याला प्रेरणा देत असतो. मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णपान म्हणजे नरवीर तान्हाजी मालुसरे. तान्हाजी मालुसरे यांचे कल्याणकारी जीवनकार्य तसेच स्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा मांडणारा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला 'सुभेदार' हा सिनेमा जून 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘शिवभक्त प्रतिष्ठान’ आयोजित समारोहात 15 हजार शिवभक्तांच्या साक्षीने कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत 'सुभेदार' या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. 'शिवराज अष्टक'मधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 






'सुभेदार' या सिनेमाच्या माध्यमातून तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. पोटच्या मुलाचं लग्न बाजूला सारून किल्ले कोंढाण्याच्या शिखरावर स्वराज्याचं विजयी तोरण बांधण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका बलाढ्य योद्ध्याचा रोमहर्षक पराक्रम 'सुभेदार'मध्ये अनुभवायला मिळेल. 


संबंधित बातम्या


Ajay Purkar : अजय पुरकर पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत; 'सुभेदार'मध्ये साकारणार तानाजी मालुसरेंची भूमिका