Dhurandhar Sara Arjun: रणवीर सिंहच्या बहुचर्चित ‘धुरंधर’ या ऍक्शनपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिली ती म्हणजे या चित्रपटातील नायिका सारा अर्जुन (Sara Arjun). वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी तिने ट्रेलरमध्ये ज्या प्रकारे स्क्रीन प्रेझेन्स दाखवलाय, त्यामुळे अनेकांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे. सारा अर्जुन नेमकी कोण आहे? ही एकच चर्चा सध्या चाहत्यांमध्ये आहे. शिवाय रणवीर सिंह (Ranveer SIngh) आणि सारा यांच्या वयातील अंतराचीही चर्चा रंगलीय. सारा तब्बल 20 वर्षांनी रणवीरपेक्षा लहान आहे.
Who is Sara Arjun: सारा अर्जुन कोण?
18 जून 2005 रोजी मुंबईत जन्मलेली सारा, साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता राज अर्जुन यांची मुलगी आहे. केवळ वर्षभराची असताना तिला एका मॉलमध्ये पाहून तिच्या पहिल्या जाहिरातीचं शूट ठरलं आणि त्यानंतरपासून ती जाहिराती, फोटोशूट आणि नंतर चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिली आहे.
रणवीर-सारा वयातील अंतरामुळे चर्चा
रणवीर सिंह सध्या 40 वर्षांचा आहे. तर धुरंधरमधील त्याची हिरोईन सारा अर्जुन नुकतीच 20 वर्षांची झाली आहे. त्यामुळे ‘धुरंधर’मध्ये या दोघांची जोडी पाहून प्रेक्षकांमध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या. ट्रेलरपूर्वी काही महिन्यांपूर्वीच समोर आलेल्या फर्स्ट लुक पोस्टरनंतरही अशीच चर्चा रंगली होती.
‘पोन्नियिन सेल्वन’ने दिली मोठी ओळख
साराने मणिरत्नम दिग्दर्शित महाकाय ‘पोन्नियिन सेल्वन’ मालिकेत यंग नंदिनीची भूमिका साकारली होती. ऐश्वर्या राय यांनी साकारलेल्या नंदिनीसोबत तिची तुलना होत राहिली आणि इथूनच सारा प्रचंड चर्चेत आली.
अभिनय कारकिर्दीची सुरुवात
2011 मधील हिंदी चित्रपट '404' आणि 'तमिळ देइवा थिरुमगल' मधून तिने अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर 'एक थी डायन', 'जय हो', 'जज़्बा', 'द साँग ऑफ स्कॉर्पियन्स', 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा', 'अजीब दास्तान्स' अशा अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार आणि तरुण अभिनेत्री म्हणून ती दिसली आहे.
वडील साउथ सुपरस्टार, आई डान्स टीचर
सारा साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता राज अर्जुन यांची मुलगी आहे. साराच्या कुटुंबात तिच्या वडिलांबरोबरच आई सान्या अर्जुन आहे. सान्या अर्जुन एक प्रशिक्षित डान्स टीचर आहेत. साराला लहान भाऊही आहे. त्याचं नाव सुहान आहे. सुहाननेदेखील एका शॉर्ट फिल्ममधून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं आहे.
नेट वर्थ किती? कशात निपुण?
काही अहवालांनुसार ‘पोन्नियिन सेल्वन’च्या यशानंतर सारा अर्जुनची कमाई जवळपास ₹10 कोटीवर पोहोचली. तिला कधीकाळी भारतातील सर्वात श्रीमंत बालकलाकार म्हणूनही ओळख मिळाली होती. ती केवळ अभिनयातच नव्हे, तर कत्थक, हिप-हॉप, तसेच जिम्नॅस्टिक, कराटे आणि एमएमएसारख्या कौशल्यांमध्येही निपुण आहे. ‘धुरंधर’च्या ट्रेलरमधून साराचं एक नवं रूप प्रक्षकांना पाहायला मिळालंय. तिची झेप आता आणखी उंचावण्याची चिन्हं दिसत आहेत. अभिनय, व्यक्तिमत्त्व आणि प्रतिभेमुळे सारा अर्जुन इंडस्ट्रीतील नवतारकांपैकी एक ठरणार हे निश्चित आहे.