आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना होण्याआधी कर्णधार विराट कोहलीसह भारतीय संघातल्या साऱ्या शिलेदारांनी हा चित्रपट पाहिला आणि त्यातून नव्यानं प्रेरणा घेतली.
या शोसाठी विराटच्या साथीनं त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही उपस्थित होती.
सचिनच्या आयुष्यातल्या ज्या ज्या क्षणांनी आपल्याला प्रेरणा दिली त्या त्या क्षणांच्या आठवणी हा चित्रपट पाहताना जाग्या झाल्या, अशी बोलकी प्रतिक्रिया टीम इंडियाच्या शिलेदारांनी व्यक्त केली.
त्यानंतर या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरला सचिनचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली.
सचिननं आचरेकर सरांना वाकून केलेला नमस्कार त्यांच्या विनम्रतेची पुन्हा प्रचीती देणारा ठरला. मग सचिननं पत्नी अंजली आणि मुलं सारा-अर्जुनसोबत पोझ दिली, त्या वेळी कॅमेऱ्याच्या फ्लॅशच्या लखलखाटानं तो परिसर उजळून निघाला.
धोनीची प्रतिक्रिया
"हा सिनेमा खूप प्रेरणादायी, खूप सुंदर आहे. सचिनच्या पदार्पणापासून रिटायर्टमेंटपर्यंत, भारतात आणि खेळात कसा फरक पडत गेला, हे तुम्हाला लक्षात येईल.
हा सिनेमा सचिनची मेहनत दाखवतो, सचिन दाखवतो. यंगस्टर्सना प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे. केवळ टॅलेंट असून उपयोग नाही, तर त्याला मेहनतीची जोड हवी, तेच या सिनेमातून दिसतं" असं धोनीने नमूद केलं.
विराट कोहलीची प्रतिक्रिया
"हा सिनेमा खूप खास आहे. बालपणीच्या आठवणी परत जाग्या झाल्या. मला क्रिकेटर बनण्याची प्रेरणा ज्यामुळे मिळाली, ते क्षण आठवले. सचिन कसा होता, त्याची मेहनत कशी होती, हे नव्याने पाहायला मिळालं. या सिनेमाला मोठं यश मिळेल", असं विराट कोहली म्हणाला.