बलमा ये तेरा नाचे... हिंदी 'झिंगाट'चा व्हिडिओ रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2018 02:58 PM (IST)
सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने हिंदी झिंगाट गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं असून अजय-अतुल यांनी गायलं आणि संगीतबद्ध केलं आहे
मुंबई : 'उरात होतंय धडधड लाली गालावर आली...' हे शब्द ऐकून फक्त मराठीच नाही, तर देशातीलच सर्वभाषिक प्रेक्षकांची पावलं थिरकली होती. 'सैराट' चित्रपटातला हा पॉप्युलर डान्स नंबर आता हिंदीत ऐकायला मिळत आहे. 'धडक' चित्रपटातील 'झिंगाट' गाण्याचा व्हिडिओ रिलीज झाला आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. अजय-अतुल यांनी 'धडक'मधील गाण्यांना संगीत दिलं आहे. अजय-अतुल यांनीच हे गाणं गायलं असून अमिताभ भट्टाचार्य यांचे शब्द आहेत. इशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'धडक' हा नागराज मंजुळेंच्या गाजलेल्या 'सैराट' या मराठी सिनेमाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 'सैराट'मध्ये आर्ची-परशाची जोडी होती, तर 'धडक'मध्ये मधुकर आणि पार्थवी अशी मुख्य व्यक्तिरेखांची नावं आहेत. सैराटची कथा सोलापुरात घडते तर धडकमध्ये राजस्थानची पार्श्वभूमी आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शशांक खैतानने पेलली आहे. 'धडक' चित्रपट 20 जुलै 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील 'तेरे नाम की कोई धडक है ना' हे 'धडक'मधील गाणं रिलीज झालं आहे. अजय-अतुलच्या 'कोंबडी'च्या चालीवर 'चिकनी चमेली' हे गाणं हिंदीत गाजलं आहे. त्यामुळे 'झिंगाट'च्या हिंदी आवृत्तीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराटने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. तर अनेक पुरस्कारही खिशात घातले होते. त्यामुळे हिंदी रिमेक असलेला धडक बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे प्रदर्शनानंतरच कळेल. पाहा व्हिडिओ :