नवी दिल्ली : दिल्लीतील एका बिझनेसमनने बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. रोहित विग नावाच्या व्यावसायिकाने आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप इशाने केला होता.

रोहित विग यांनी 'नजरेने आपल्यावर बलात्कार केला' असा आरोप इशा गुप्ताने ट्विटरवरुन केला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीतील साकेत कोर्टात रोहितने इशा गुप्ताविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. नुकसानभरपाईसोबतच इशा गुप्ताला शिक्षा व्हावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

'तक्रारदार तरुणी (इशा गुप्ता)ने सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानंतर जवळचे मित्र आणि सहकारी वारंवार मला आणि माझ्या कुटुंबीयांना फोन करुन प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे' असं रोहित यांनी याचिकेत लिहिलं आहे. 'माझ्याविरोधात केलेले खोटे आणि अपमानजनक दावे खरे मानून माझ्या नैतिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे' असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.

इशाने 6 जुलैला ट्विटरवर रोहित यांचा फोटो पोस्ट केला होता. 'हा माणूस अक्षरशः नजरेने माझ्यावर बलात्कार करत होता. ही परिस्थिती नीट हाताळल्याबद्दल माझ्या सुरक्षारक्षकांचे आभार. कोणी याला ओळखतं का?' असं इशाने पोस्टमध्ये लिहिलं.


'एखाद्या महिलेकडे रात्रभर टक लावून पाहणं आणि तिला अनकम्फर्टेबल करणं ठीक आहे, असं या माणसाला वाटतं. त्याने मला स्पर्श केला नाही, किंवा एक शब्दही बोलला नाही. पण सतत टक लावून पाहत होता. एक चाहता म्हणून तो अभिनेत्रीकडे पाहत नव्हता. मी बाई आहे म्हणून तो असं वागला. आपण कुठे सुरक्षित आहोत? स्त्री असणं हा शाप आहे का?' अशी पोस्ट इशाने केली होती.






28 ऑगस्टला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.