नीरज पांडेंच्या 'अय्यारी'ला संरक्षण मंत्रालयाची हरकत
एबीपी माझा वेब टीम | 02 Feb 2018 05:32 PM (IST)
आपल्या प्रतिनिधींनी सिनेमाला मंजुरी दिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देऊ नये, असं सांगत संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतल्याचं म्हटलं जातं.
मुंबई : 'पद्मावत'नंतर आता नीरज पांडे यांच्या 'अय्यारी' चित्रपटामागे शुक्लकाष्ठ लागलं आहे. सेन्सॉर बोर्ड अय्यारीला क्लीन चिट देण्यास काचकूच करत आहे. संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतल्यामुळे त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेट देणार नाही. सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला अय्यारी चित्रपटाचं कथानक लष्करातील भ्रष्टाचारावर आधारित आहे. यामुळे संरक्षण मंत्रालयाने सिनेमाबाबत चिंता व्यक्त केली आहे. चुकीच्या गोष्टी दाखवल्या जाण्याच्या भीतीमुळे संरक्षण मंत्रालयाने सिनेमा पाहण्या आधीच अय्यारीच्या रिलीजला आडकाठी केल्याची माहिती आहे. आपल्या प्रतिनिधींनी सिनेमाला मंजुरी दिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देऊ नये, असं सांगत संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतल्याचं म्हटलं जातं.